‘न्यू इंडिया बँके’च्या तिजोरीवर जनरल मॅनेजर हितेश मेहताचा डल्ला; 122 कोटींचा अपहार, गुन्हा दाखल

कोट्यवधी रुपयांच्या तोट्यामुळे डबघाईला आलेल्या ‘न्यू इंडिया को-ऑप. बँके’वर गुरुवारी रात्री रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 6 महिन्यांसाठी निर्बंध घातले. यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला असून बँकेच्या शाखांबाहेर रांगाच रांगा लागल्या आहेत. हा गोंधळ थांबत नाही तोच याच बँकेच्या तिजोरीवर जनरल मॅनेजर अँड हेड ऑफ अकाऊंडट्स हितेश प्रविणचंद मेहता याने कोट्यवधींचा डल्ला मारल्याचे समोर आले आहे. प्रभादेवी आणि गोरेगाव येथील शाखांमधून हितेश मेहता याने तब्बल 122 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दादर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘फ्री प्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, हितेश मेहता हा न्यू इँडिया को. ऑप. बँकेचा जनरल मॅनेजर असताना त्याच्यावर प्रभादेवी आणि गोरेगाव शाखेची जबाबदारी होती. त्यावेळी त्याने आणि त्याच्या साथीदारांनी 122 कोटी रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी वरळी येथील रहिवासी देवश्री घोष यांनी दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी हितेश मेहताविरुद्ध कलम 316(5) आणि 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दादर पोलिसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

न्यू इंडिया बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादले निर्बंध, खातेदारांमध्ये घबराट, लांबच लांब रांगा

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी रात्री न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला नोटीस बजावली आणि सर्व आर्थिक व्यवहार थांबवण्याचे आदेश दिले. या कारवाईबद्दल शुक्रवारी सकाळी ग्राहकांना मेसेज येण्यास सुरुवात झाली. रिझर्व्ह बँकेने अचानक केलेल्या कारवाईने ग्राहकांना चिंतेत टाकले. कुठलीही आगाऊ कल्पना न देताच निर्बंध घातल्याने ग्राहकांनी रिझर्व्ह बँकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.