नजरचुकीने दुसऱ्या बँक खात्यात गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी दिगंबर (नाव बदललेले) यांनी गुगलवर मिळालेल्या कस्टमर केअरशी संपर्क साधला आणि ते अलगद आरोपींच्या जाळ्यात सापडले. सायबर भामटय़ांनी मिळालेल्या संधीचा फायदा उचलत दिगंबर यांना पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांची पाच लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केली.
दिगंबर यांच्या नजरचुकीने त्यांच्या बँक खात्यातून दुसऱ्यां बँक खात्यात पैसे वळते झाले. हे लक्षात येताच दिगंबर यांनी गुगल सर्च इंजिनवर कस्टमर केअरचा नंबर शोधला व त्यावर संपर्क साधला. तेव्हा समोरून बोलणाऱ्यांनी तुमचे पैसे परत मिळवून देतो असे सांगत दिगंबर यांच्याकडील पाच लाख 98 हजार 865 रुपये शिताफीने काढून घेतले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिगंबर यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक तसेच निरीक्षक दीपाली कुलकर्णी, प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधीर पलसे तसेच जगताप, बंडगर, भाबल, प्रगती घरत, राठोड, रुपाली हाडवळे या पथकाने तपास सुरू केला.
दिगंबर यांची फसवणूक केलेल्या रकमेपैकी 93,996 रुपये हे आयडीबीआय बँकेच्या एका खात्यात वळती करण्यात आली होती. अधिक तपासात गुह्यातील पाहिजे आरोपी हे गुजरातच्या कामरजे परिसरात असल्याचे समजले.
सुरतमध्ये महिला हाती लागली
पथकाने लगेच सुरतला धाव घेतली आणि आयडीबीआय बँकेतील त्या खात्याची धारक डॉली गौतम वादवाना हिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने सदरचे खाते हे कर्ज घेण्यासाठी अज्ञात व्यक्तीला उघडून दिल्याचे सांगितले. त्यामुळे तिला पुढील चौकशीकरिता घाटकोपर पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.