
अमेझॉन कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा गुन्हे शाखेच्या युनिट-10 ने पर्दाफाश केला. याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. अंधेरी परिसरात काही जण अमेझॉन कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून फसवणूक करत असल्याची माहिती युनिट-10 च्या पथकाला मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक कुर्ला-अंधेरी परिसरातील एका ठिकाणी गेले. त्या ठिकाणी पाच जण कानाला हेडफोन लावून बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्या पाच जणांकडे पोलिसांनी चौकशी केली. या कॉल सेंटरवरून स्वयंचलित टेलिफोन प्रणालीद्वारे (रेकॉर्ड असलेला मेसेज-आयव्हीआर) संदेश दिला जातो. अमेझॉनवर आयफोन 16 प्रो खरेदी करण्यात आला आहे का? जर तो खरेदी केला नसेल तर रद्द करण्यासाठी 1 क्रमांकाचे बटन दाबावे, असे सांगितले जाई.
नागरिकांनी एक नंबर दाबल्यास तो फोन कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये जायचा. त्यानंतर कॉल सेंटरचे कर्मचारी नागरिकांना भीती दाखवायचे. हे प्रकरण गंभीर असून तो कॅनेडियन सरकारी क्राऊन अॅटर्नी कोर्ट हाऊसमध्ये जोडल्याचे त्यांना भासविले जाई. त्यानंतर 100 डॉलरचे गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास भाग पाडायचे. गिफ्ट कार्डचे पैसे स्वतःच्या खात्यात घेतले जात असत.