मुंबई गुन्हे शाखेने दीड महिन्यापूर्वी बालकांची खरेदी-विक्री करणारे एक रँकेट पकडले होते. तितकेच करू न थांबता पथकाने या प्रकरणाच्या खोलात जाऊन कसून तपास करत कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. या कालावधीत पोलिसांनी विक्री झालेल्या नऊ बालकांची सुटका करून मुलांच्या खरेदी-विक्रीचा गोरखधंदा करणाऱया 31 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आणखी कारवाया होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई गुन्हे शाखेने एप्रिल महिन्यात नवजात बालकांची खरेदी-विक्री करणाऱया रँकेटचा पर्दाफाश केला होता. अंमलबजावणी शाखेच्या उपायुक्त रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धडक कारवाई करत एका डॉक्टरसह सहा दलालांना पकडून दोन बालकांची सुटका केली होती. एवढेच करून न थांबता पोलिसांनी आणखी खोलात जाऊन तपास करत दोनच दिवसांनी आणखी तीन महिलांना अटक केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे विशाखापट्टणम येथून आणखी चार महिलांना अटक केली होती. या धडक कारवाईनंतर तिथवर न थांबता उपायुक्त रागसुधा आर यांनी मुलांची विक्री करणाऱया आरोपींची साखळीच तोडायचे ठरवले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने कसून तपास करत दीड महिन्यात विक्री झालेल्या नऊ बालकांची सुटका करून या प्रकणात 31 जणांना अटक केली आहे. आणखी कारवाया होणार असल्याचे सांगण्यात येते.
आतापर्यंत नऊ बालकांची सुटका करण्यात आली असून त्यात तीन मुले आणि सहा बालिकांचा समावेश आहे. रत्नागिरी, पुणे, मालाड, वारंगल आणि लातूर येथून प्रत्येकी एक तर हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथून दोन बालकांची सुटका करण्यात आली आहे. या बालकांमध्ये तीन वर्षांचा एक, दोन वर्षांचे दोन आणि उर्वरित बालके एक वर्षाखालील आहेत.
31 आरोपींमध्ये पाच पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे. त्या महिलांमध्ये दोन मातादेखील आहेत. तर अटक केलेल्यांमध्ये महाराष्ट्रातले 15, आंध प्रदेशातील सात आणि उर्वरित तेलंगणातील आरोपींचा समावेश आहे.