
बोरिवली पश्चिमेला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत अनधिकृत थाटलेले कॉल सेंटर मुंबई गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले. या कॉल सेंटरमधून मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक अडचण दूर करण्याच्या बहाण्याने अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात होती. या कारवाईत चार जणांना अटक करून दोन लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
बोरिवली पश्चिमेला अमरकांत झा मार्गावर अर्पण अपार्टमेंट नावाची बांधकाम सुरू असलेली इमारत असून त्या इमारतीत बोगस कॉल सेंटर थाटण्यात आले होते. त्यामधून अमेरिकन नागरिकांना संपर्क साधला जातो. त्यांच्या संगणकात काही अडचणी वगैरे आहेत का, अशी विचारणा करून शिताफीने त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेतली जाते. मग मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित अमेरिकन नागरिकांचे बँक खाते हॅक केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार युनिट-12 च्या पथकाने छापेमारी करून कॉल सेंटर चालविणारा, क्लोसर आणि दोन टीम लीडर अशा चौघांना ताब्यात घेतले.