एक कोटी 46 लाख किमतीचा एमडी, कोडेनच्या बाटल्या जप्त, ड्रग्जविरोधात धडक कारवाई

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने शहरातील विविध ठिकाणी धडक कारवाई करून जवळपास एक कोटी 46 लाख किमतीचा ड्रग्जचा साठा जप्त केला. या कारवाईत सात ड्रग्ज पेडलर्सना अटक केली.

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनीटने वडाळा पूर्वेकडे ड्रग्स विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा ड्रग्स पेडलर्संना पकडून त्यांच्याकडून 302 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्स जप्त केले. वरळी युनीटने एका पेडलरला पकडून 21 लाख 50 हजार रुपये किमतीचे 86 ग्रॅम एमडी हस्तगत केले. याशिवाय वाडीबंदर येथे घाटकोपर युनीटने एका पेडलरला पकडून त्याच्याकडून 15 लाख किमतीचे 75 ग्रॅम एमडी पकडले. तसेच कांदिवली युनीटनेच वडाळा पूर्वकडे एकाला पकडून 15 लाख 60 हजार किमतीचा एमडी पकडला. याशिवाय वांद्रे युनीटने घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील छेडानगर जंक्शन येथे दोघा पेडलर्सना पकडून 840 कोडेन फॉस्फेट मिश्रीत बॉटल्स पकडल्या. अशा प्रकारे पोलिसांनी सात जणांना पकडून एक कोटी 46 लाख किमतीचा ड्रग्जचा साठा जप्त करण्याची कारवाई केली.