मुंबई क्रिकेटचे वैभव लवकरच संग्रहालयात, वानखेडेवर होणार एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालय

हिंदुस्थानी क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडेवर मुंबई क्रिकेटचे वैभव ऐतिहासिक-संस्मरणीय वस्तू आणि डिजिटल तंत्रज्ञानासह संग्रहालयरूपी साकारले जाणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) आधारस्तंभ असलेल्या शरद पवार यांच्याच नावाने हे क्रिकेट संग्रहालय येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला क्रिकेटप्रेमींच्या सेवेत दाखल होणार असून त्याचा शुभारंभ आज खुद्द शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. हिंदुस्थानातील क्रिकेटप्रेमींना आणि क्रिकेटपटूंनाही हेवा वाटेल, जागतिक दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असे क्रिकेट संग्रहालय उभारण्याचे ध्येय एमसीएने समोर ठेवले आहे.

हिंदुस्थानी क्रिकेटची इमारत ही मुंबई क्रिकेटच्या योगदानावर उभी राहिली आहे आणि आजही मुंबईचे क्रिकेटच त्याचा पाया आणि हृदय आहे. मुंबईचा वैभवशाली इतिहास नव्या पिढीसमोर यावा म्हणून एमसीएने वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संग्रहालय निर्मितीचे आव्हान स्वीकारले आहे. या संग्रहालयात मुंबई क्रिकेटच्या 42 रणजी जेतेपदांचा इतिहास सर्वांना ‘याचि देही याचि डोळा’ पाहताही येणार आणि अनुभवताही येणार. एवढेच नव्हे तर नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने संस्मरणीय भेटवस्तूंसह हायटेक स्वरूपातही हा ठेवा प्रत्येक क्रिकेटप्रेमीला पाहता येणार असल्याची माहिती एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली.

मुंबई क्रिकेटच्या दिग्गजांना आवाहन

मुंबईच्या इतिहासात सोनेरी कामगिरी करणाऱया सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसह रणजीपटूंना आपल्याकडे असलेला संस्मरणीय ठेवा, वस्तू , स्मृतिचिन्ह संग्रहालयासाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन एमसीएने मुंबईच्या शेकडो राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना केले आहे. या वस्तू आल्यानंतर त्यांना संग्रहालयात कशा प्रकारे सामावून घ्यावे याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती सचिव अभय हडप यांनी दिली.

पर्यटकांचेही आकर्षण ठरणार

वानखेडे स्टेडियम म्हणजे जागतिक क्रिकेटच्या नकाशावर आदराने घेतले जाणारे नाव. या स्टेडियममध्ये मुंबई क्रिकेटचे वैभव साकारताना ते पर्यटकांचेही पसंतीचे केंद्र बनावे याच उद्देशाने संग्रहालय बनविले जाणार आहे. एवढेच नव्हे तर मुंबई दर्शनातही या संग्रहालयाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती एमसीएने दिली.

वानखेडेच्या सुवर्ण महोत्सवाचेही फलक

वानखेडेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एमसीएने फलक लावला आहे. वानखेडे स्टेडियम गेली पाच दशके क्रिकेटच्या संस्मरणीय आठवणी आपल्या अंगाखांद्यावर खेळवतोय. ते स्टेडियम अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साक्षीदार आहे. वानखेडे स्टेडियमबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱया या फलकाचे अनावरणही राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड, एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, अभय हडप, संजय नाईक, अरमान मलिक, दीपक पाटील, नीलेश भोसले यांच्यासह अनेक क्रिकेट संघटक उपस्थित होते.

जगज्जेत्या हिंदुस्थानसाठी वेगळे दालन

2011 साली अवघ्या जगाने हिंदुस्थानला वर्ल्ड चॅम्प होताना पाहिले. ही आठवण ताजी करण्यासाठी एमसीए या संग्रहालयात एक वेगळे हायटेक दालन उभारणार आहे. या दालनात क्रिकेट़फ्रेमी आपल्याला हवा असलेला सामना, हवे असलेले क्षण नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाहू शकणार आहे. सामन्यांच्या चित्रफिती, आवडते शॉट्स चाहत्यांना या संग्रहालयात जिवंत करता येणार आहे. या संग्रहालयात थ्री नव्हे तर सेव्हन डी तंत्रज्ञानाचाही वापर करून काही क्षण प्रत्यक्ष जिवंत केले जाणार आहे.

क्रिकेट पुस्तकांचाही खजिना

या संग्रहालयात क्रिकेटचा सारा इतिहासही पुस्तकांच्या रूपाने चाहत्यांना पाहता आणि वाचता येणार आहे. क्रिकेट विश्वाला व्यापणारे, इतिहास रचणारे, इतिहास घडवणारे, वादग्रस्त ठरलेल्या सर्व गोष्टींवर क्रीडा विश्वात उपलब्ध असलेले जागतिक आणि दुर्मिळ पुस्तके या संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. हिंदुस्थानच्याच नव्हे तर जगभरातील दिग्गजांच्या आत्मकथा, त्यांनी लिहिलेली पुस्तकेही या संग्रहालयाचा खजिना बनणार आहेत.