
मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए ) वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करणार आहे. मुंबईचा अभिमान असलेल्या या ऐतिहासिक स्टेडियमचा पन्नासावा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी नववर्षाला विशेष कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली.
एमसीएच्या वतीने आयोजित केला जाणार हा उत्सव सोहळा 12 ते 19 जानेवारीदरम्यान होईल. या कार्यक्रमाचा समारोप वानखेडे स्टेडियमवर एका दिमाखदार सोहळय़ासह केला जाणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले. समारोपाच्या भव्य सोहळय़ात मुंबई तसेच आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज आजी-माजी क्रिकेटपटू एकत्र येतील. या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि संगीतकार अजय-अतुल यांचे आकर्षक सादरीकरण तसेच एका शानदार लेझर शोचेही आयोजन केले जाणार आहे.
एमसीएच्या पदाधिकाऱ्यांसह ऍपेक्स कौन्सिलच्या सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत 50 व्या वर्धापन दिनाच्या विशेष लोगोचे अनावरण करण्यात आले. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी 19 जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमच्या समृद्ध वारशाचा सन्मान करण्यासाठी स्मृती टपाल तिकीट आणि एक कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्याची योजना जाहीर केली. या ऐतिहासिक स्टेडियमला सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि इतर दिग्गज क्रिकेटपटूंच्या खेळाने गौरव मिळाला आहे. एमसीए समारोपाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सत्कार करणार आहे.
1974 साली बांधलेले वानखेडे स्टेडियम हे जगातील सर्वात प्रतिष्ठत क्रिकेट मैदानांपैकी एक असून हे स्टेडियम क्रिकेट इतिहासातील अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार राहिले आहे. सचिन तेंडुलकरच्या 2013 मधील शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासून हिंदुस्थानच्या ऐतिहासिक 2011 च्या वन डे विश्वचषक विजयापर्यंत हे मैदान असंख्य आठवणींचे घर आहे. पत्रकार परिषदेत बोलताना एमसीएचे सचिव अभय हडप म्हणाले, ‘वानखेडे स्टेडियमचे क्रिकेटप्रेमींच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. 50 व्या वर्धापन दिनाचे हा उत्सव एमसीएसाठी आणि संपूर्ण क्रिकेट समुदायासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. यानिमित्ताने अस्सल क्रिकेटप्रेमींना या सोहळय़ात सहभागी होण्याचे आवाहन एमसीए सचिवांनी केले. या सोहळय़ाची तिकिटे ऑनलाईन उपलब्ध असतील, अशीही माहिती हडप यांनी दिली.