मुंबई क्रिकेट असोसिएशनचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अजिंक्य नाईक आणि संजय नाईक हे दोघांमध्ये 23 जुलैला जोरदार लढत रंगणार आहे. ही अध्यक्षपदाची निवडणूक आनंदाची नव्हे तर दुःखाची असल्याचे भावनिक मत अध्यक्षपदाचे उमेदवार अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केलेय.
एमसीएची ही निवडणूक नेहमीप्रमाणे उत्साहावर्धक नसली तरी चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही नाईकांना राजकीय पाठिंबा लाभल्यामुळे शेवटच्या दिवसांत या निवडणुकीला राजकीय रंगही चढण्याची शक्यता आहे. या निवडणुकीनिमित्ताने अजिंक्य नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही निवडणूकही मेरिटवरच होणार असल्याचे म्हटले. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे हे माझे अत्यंत जिवलग मित्र होते. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनची ही निवडणूक आमच्यासाठी आनंदाची नसून दुःखाची आहे. त्याचबरोबर मुंबईला क्रिकेटचा इतिहास लाभला आहे. मुंबईचा हाच क्रिकेटचा इतिहास आम्ही पुढे घेऊन जाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. तसेच यापूर्वीच मुंबईतील रणजी खेळाडूंनादेखील एमसीएने बीसीसीआयप्रमाणे मानधन सुरू केले आहे. असे मानधन देणारी एमसीए ही देशातील पहिली संघटना आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतरदेखील असेच काम पुढे करणार असल्याचे अजिंक्य नाईक यांनी सांगितले. यावेळी अॅपेक्स काwन्सिल मेंबर व आमदार जितेंद्र आव्हाड, दीपक पाटील, अभय हडप तसेच ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट होणाऱया पहिल्या महिला क्रिकेटपटू डायना एडुलजी आणि माजी कसोटीपटू मिलिंद रेगे हेदेखील उपस्थित होते.