2008 च्या मालेगाव बॉम्बस्पह्टातील आरोपी, भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर वॉरंटची टांगती तलवार कायम आहे. प्रज्ञा सिंह यांच्याविरुद्ध बजावलेल्या जामीनपात्र वॉरंटच्या स्थगिती आदेशाची मुदत विशेष एनआयए न्यायालयाने 12 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली. तब्येतीच्या कारणावरून प्रज्ञा सिंह यांना हा तात्पुरता दिलासा मिळाला. मालेगाव बॉम्बस्पह्टाच्या खटल्यात साध्वी प्रज्ञा सिंह यांनी वेळोवेळी गैरहजेरी लावली. खटला अंतिम टप्प्यात असताना त्यांनी दांडी मारल्याने न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यामुळे प्रज्ञा सिंह यांच्या चिंतेत भर पडली आहे. यादरम्यान त्यांनी तब्येत ठीक नसल्याचे सांगितल्यानंतर न्यायालयाने वॉरंटला तात्पुरती स्थगिती दिली होती. बॉम्बस्पह्ट खटल्याची सोमवारी सुनावणी झाली, त्यावेळी प्रज्ञा सिंह यांच्या वकिलांनी पुन्हा तब्येतीचे कारण पुढे केले आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या 12 जानेवारी 2025 नंतर सुनावणीसाठी हजर राहू शकतील, असे अॅड. जे. पी. मिश्रा यांनी सांगितले.