
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची रचना कारसाठी नसल्याचे परखड मत ब्रिटीश वाहतूक तज्ञ ख्रिश्चन वोल्मर यांनी मांडले. मुंबई हे कारसाठी अनुकूल शहर नसून अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. या शहरावर दुचाकी वाहनांनी तर कब्जाच केला आहे हे पाहून मी थक्क झालोय, असे वोल्मर यांनी सांगितले. त्यांनी दोन दिवस संपूर्ण मुंबई शहरात भटकंती केली.
हिंदुस्थानच्या दौऱ्यात वोल्मर यांनी कोलकात्यालाही भेट दिली आणि तेथील रेल्वेचे कौतुक केले. मुंबई हा वोल्मर यांच्या प्रवासाचा शेवटचा थांबा होता. महाराष्ट्राच्या राजधानीत त्यांनी मोनोरेल, भूमिगत मेट्रो आणि उपनगरीय रेल्वेसह इतर सर्व वाहतुकीच्या पर्यायांचा वापर केला. मुंबईतील गर्दी आणि वाहतूक कोंडी हे पाहता अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीला अधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सुचवले. शहरातील मेट्रो नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर प्रवासातील अडचणी कमी होण्यास मदत होईल. येथील भूमिगत मेट्रो जवळजवळ लंडनच्या नवीन क्रॉसरेल किंवा एलिझाबेथ लाईनइतकीच सुसज्ज आहे असे वाटते, असेही ते म्हणाले.