नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस झालेच पाहिजे; 15 ऑगस्टपूर्वी निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण

हिंदुस्थानच्या रेल्वेचे जनक, थोर समाजसुधारक आणि मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला 15 ऑगस्टपर्यंत द्यावे. तसे न झाल्यास बेमुदत उपोषण करू, असा इशारा समस्त नानाप्रेमींनी आज दिला. मुंबई सेंट्रल टर्मिनसाचे नामांतर तत्काळ ‘नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस’ असे करावे, या मागणीसाठी नानाप्रेमींनी ग्रॅण्टरोड येथील नाना चौकात साखळी आंदोलन केले.

नाना शंकरशेट यांच्या 159 व्या पुण्यतिथी निमित्ताने नाना शंकरशेट प्रतिष्ठान, दैवज्ञ समाजोन्नती परिषद व विविध संस्थांचे सदस्य नाना चौक येथे एकवटले. त्यांनी नानांच्या पुतळय़ाला अभिवादन करून पेंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साखळी आंदोलन केले.

यावेळी नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, दैवज्ञ समाजोन्नती परिषदचे उपाध्यक्ष डॉ आनंद पेडणेकर, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, सूर्यकांत कल्याणकर, रवींद्र माहीमकर, सच्चिदानंद हाटकर, डॉ. विवेक रायकर, प्रा. डॉ. अनुराधा पोतदार, ‘मुंबई समाचार’चे संपादक निलेश दवे, पद्मिनी शंकरशेट, उदय शंकरशेट, विनोद मडकईकर, सुधाकर पेडणेकर, संजय पितळे, मोहन म्हाप्रळकर, संजय (नाना) वेदक, सुभाष हरचेकर, अश्विन उपाध्याय, आरती मालडीकर, दिलीप मालंडकर, जयंत पेडणेकर, चंद्रकांत पाटणकर, विजय धारगळकर, कालिदास कांदळगावकर, दीपक राजपूरकर, डॉ. विष्णुपंत पाटणकर, अनिल कारेकर, प्रकाश चिखलीकर, शशिकांत पावसकर, अजित पितळे उपस्थित होते.

नानांच्या योगदानाकडे केंद्राचे दुर्लक्ष
आशिया खंडातील पहिली रेल्वे हिंदुस्थानात धावली ती केवळ नाना शंकरशेट यांच्या प्रयत्नांमुळे. केंद्र सरकार नानांच्या या योगदानाकडे डोळेझाक करत आहे. हिंदुस्थानी रेल्वेच्या जनकाचे नाव तत्काळ मुंबई सेंट्रल टर्मिनसला देऊन त्यांच्या कार्याला मानवंदना द्यावी, अन्यथा बेमुदत उषोषण करू, असा इशारा नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर यांनी दिला. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी म्हणाले, मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव देण्यासाठी आम्ही लढत आहोत. आम्ही 1996 पासून पाठपुरावा करत आहोत. 2020मध्ये राज्य सरकारनेही हा प्रस्ताव मंजूर केला होता; मात्र अद्याप तो केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.

एलफिन्स्टन महाविद्यालयात तैलचित्राचे अनावरण
नामदार नाना शंकरशेट यांच्या भव्य तैलचित्राचे एलफिन्स्टन महाविद्यालयातील लायब्ररीत डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे पुलगुरू डॉ. राजनीश कामत, डीन डॉ. सौमित्रा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आले. मुंबईचे एलफिन्स्टन महाविद्यालय स्थापन करण्यात नाना शंकरशेट यांचा सिंहाचा वाटा होता. यावेळी सुरेंद्र शंकरशेट, मनमोहन चोणकर, डॉ. गजानन रत्नपारखी, चंद्रशेखर दाभोळकर उपस्थित होते.