
ऐन गर्दीच्या वेळी मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. माटुंगा स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्याने लोकलसेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास वेळेत कार्यालयात पोहोचण्याच्या लगबगीत असणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ जलद मार्गावर सकाळच्या सुमारास इमारतीच्या बांधकामाचे साहित्य पडले होते. ओव्हरहेट वायरवर बांबू कोसळल्याचे दिसताच मोटरमनने वेळीच लोकल थांबवल्याने अनर्थ टळला.
त्यानंतर मध्य रेल्वेच्या प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि 8.20 मिनिटांनी ओव्हरहेड वायरवर पडलेले बांबू बाजुला केले. त्यानंतर जलद मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र त्यात बराच वेळ गेल्याने लोकलसेवा 15-20 मिनिटं उशिराने धावत होती. त्यामुळे चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
View this post on Instagram
मुंबईला ऑरेंज अलर्ट
दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला. आजही हवामान विभागाने मुंबई आणि उपनगराला पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच यावेळी जोरदार वारे सुटण्याचीही शक्यता आहे.
मित्राच्या दिशेने फेकलेला रेनकोट ओव्हरहेड वायरवर अडकला, लोकलचा खोळंबा; तरुणाला दोन हजारांचा दंड