रेसकोर्स आणि कोस्टल रोडच्या 300 एकर जागेवर मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क

महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा आता पालिकेच्या ताब्यात आली असून या ठिकाणी कोस्टल रोडच्या 175 एकर जागेसह मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणच्या 211 एकर जागेपैकी 91 एकर जागा मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडला 30 वर्षांच्या भाडेपट्टय़ावर देण्यात आली आहे. याबाबतच्या जमीन हस्तांतरणाच्या कराराबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्वाक्षरीने करार करण्यात आला. या पब्लिक पार्पवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे रेसकोर्सची 120 एकर जमीन अखेर पालिकेच्या ताब्यात आली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथील 211 एकर क्षेत्राचा भूखंड हा मागील 100 वर्षांपासून अधिक काळ मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना मक्ता कराराने देण्यात आला होता. या जागेचा भाडेपट्टा करार काही वर्षांपूर्वी संपल्यानंतर हा भूखंड व्यापक नागरी हिताच्या दृष्टीने पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. यासाठी विविध कायदेशीर बाबी, वैधानिक आव्हाने आणि प्रशासकीय अडचणी यातून सर्वमान्य होईल असा मार्ग काढणे ही सर्वात आव्हानात्मक बाब होती. या पार्श्वभूमीवर आज महत्त्वपूर्ण करार झाल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ आता प्रत्यक्षात साकारणे शक्य होणार आहे.

लंडनच्या धर्तीवर होणार सेंट्रल पार्क
– पालिकेला मिळालेली 120 एकर जागा आणि रेसकोर्स परिसरामध्ये लागून असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पातील 175 एकर मोकळी जागा अशी दोन्ही मिळून जवळपास 300 एकर जागेवर न्यूयॉर्प, लंडन या शहरांच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्यात येणार आहे. या जागेचा वापर सार्वजनिक वापरासाठी होणार असल्याचा शासन निर्णयही आज जारी करण्यात आला आहे.

– सेंट्रल पार्पमुळे मुंबईचे सध्या अस्तित्वात असणारे 3 हजार 917 एकर हरित क्षेत्र वाढून आता 4 हजार 212 एकर इतके होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकूण तब्बल 300 एकरांवरील हरित क्षेत्र हे मुंबईच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनात मोलाचे योगदान ठरेल. या ठिकाणी मुंबईकरांना नैसर्गिकरीत्या उद्यानाच्या सुविधा देण्यात येणार आहे.

आम्ही मुंबईकरांना कोणतेही बांधकाम नसलेले गार्डन देणार
येणाऱया विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आमचे सरकार येईल आणि आम्ही रेसकोर्सच्या ठिकाणी कोणतेही बांधकाम नसलेले नैसर्गिक उद्यान उपलब्ध करून देऊ, असा निर्धार शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आम्ही या ठिकाणचे हेरिटेज क्लबहाऊस, स्टँड आणि स्ट्रक्चरला कोणताही धक्का लावणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबईकरांसाठी रनिंग, वॉपिंग, योगासाठी सुविधा निर्माण करणार आहोत. शिवाय पालिकेचे 100 कोटी तबेल्यांसाठी देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रेसकोर्सच्या संपूर्ण सीमांचे काटेकोरपणे सीमांकन करणार असून मुंबईकरांची मोकळी जागा वाचवू असे सांगतानाच, मिंधे-भाजपप्रमाणे मुंबईकरांच्या मोकळय़ा जागा बिल्डर मित्रांच्या घशात घालणार नसल्याचेही त्यांनी ‘एक्स’ माध्यमातून स्पष्ट केले आहे.