
>> मंगेश मोरे
‘फुकट’च्या योजनांवर उधळपट्टी करून तिजोरीत खडखडाट केलेल्या महायुती सरकारला खिसेकापू, चोरट्यांच्या पैशांनी ‘काडीचा आधार’ दिला आहे. 26 वर्षांत पश्चिम रेल्वेच्या हद्दीत घडलेल्या गुह्यांत ताब्यात घेतलेल्या आरोपींनी त्यांची जामिनाची रक्कम परत मिळवण्यासाठी दावाच केला नाही. त्यामुळे कोर्टाकडे वापराविना पडून राहिलेली त्यांची तब्बल 18 लाखांहून अधिक रक्कम अखेर सरकारी तिजोरीत जमा झाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा तसेच लोकल गाडय़ांमध्ये खिसेकापू, मारहाण, इतर प्रकारची चोरी आदी गुन्हे घडतात. रेल्वे स्थानकांच्या आवारातही विविध प्रकारचे गुन्हे घडतात. अशा गुह्यांतील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर मुंबई सेंट्रल येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाते. त्या वेळी गुह्याचे स्वरूप लक्षात घेऊन न्यायालय आरोपींची ‘प्रोव्हिजनल’ जामिनावर सुटका करते. ही रक्कम त्या-त्या गुह्यांचा खटला निकाली निघाल्यानंतर आरोपींना परत केली जाते. त्यासाठी आरोपींनी रीतसर न्यायालयाकडे दावा करण्याची गरज असते. मात्र 1991 ते 2017 या 26 वर्षांच्या कालावधीत खिसेकापू, चोरटे, मारहाणीच्या गुह्यांतील आरोपी, ड्रग्जची तस्करी अशा गुह्यांतील आरोपींनी त्यांच्या जामिनाची रक्कम परत मिळवण्यासाठी दावाच केला नाही. या अवधीतील तब्बल 18 लाख 23 हजार 500 रुपये एवढी रक्कम न्यायालय प्रशासनाकडे वापराविना पडून होती. 26 वर्षे उलटूनही जामिनाच्या रकमेवर दावा करण्यासाठी आरोपी न्यायालयाकडे फिरकलेच नाहीत. अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीला अनुसरून न्यायालय प्रशासनाने ही रक्कम सरकारकडे जमा केली आहे. महायुती सरकारच्या काळात खडखडाट झालेल्या तिजोरीत खिसेकापू, चोरटय़ांच्या पैशांची भर पडल्याने हा ‘बुडत्याला काडीचा आधार’ ठरला आहे.
- जामिनाच्या रकमेवर दावा करण्यासाठी किमान आरोपींच्या वकिलांनी पुढाकार घ्यावा म्हणून दंडाधिकारी न्यायालयाने वकील संघटनेच्या अध्यक्ष, सदस्यांना पत्र लिहिले होते. मात्र त्यानंतरही आरोपी वा त्यांचे वकील न्यायालयाकडे फिरकलेच नाहीत.
पुन्हा ‘कोर्टफेरा’ नको; पैशांवर सोडले पाणी
मुंबई सेंट्रल रेल्वे न्यायालयात किरकोळ गुह्यांचे खटले चालतात. पुरावे सादर करणे, साक्षीदार तपासणे या गोष्टी पार पाडून खटले निकाली निघण्यात अनेक वर्षे जातात. त्यानंतर निर्दोष सुटलेल्या आरोपींना आधी जमा केलेली ‘प्रोव्हिजनल’ जामिनाची रक्कम परत मिळते. मात्र अनेक वर्षे कोर्टाचे हेलपाटे घातलेले आरोपी पुन्हा कोर्टाची पायरी नको म्हणून त्या जामिनाच्या पैशांवर पाणी सोडतात, असे आरोपींची बाजू मांडणाऱया एका वकिलाने सांगितले.