![mumbai news (1)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mumbai-news-1-696x447.jpg)
मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने भायखळय़ाच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आयोजित केलेल्या पुष्पोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असताना आता उपनगरातील रहिवाशांसाठी फळे, फुले आणि भाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हे प्रदर्शन सोमवार, 10 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत रहिवाशांकरिता विनामूल्य खुले राहणार आहे.
मुंबई महापालिकेच्या सांताक्रुझ पश्चिम येथील जुहू लायन्स म्युनिसिपल पार्प अर्थात एरोप्लेन गार्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात फळे, फुले, भाज्या, आयुर्वेदिक वनस्पती, हंगामी फुलझाडे ठेवण्यात आली आहेत. उद्यान विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि उद्यान विभागातील अधिकारी, कर्मचारी प्रदर्शनासाठी मेहनत घेत आहेत.
काय पाहाल
प्रदर्शनात गुलाब, झेंडू, झिनिया, शेवंती, विविध प्रकारच्या ऑर्किड फुलांचे सुंदर देखावे या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. ‘चला जगू या रंग आयुष्याचे’ या संकल्पनेवर आधारित विविध फुलांच्या मदतीने इंद्रधनुष्य तयार करण्यात आलेला आहे. त्याच्या विविध रंग आणि त्याचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व असा प्रदर्शनाचा आशय आहे. आनंद, आशा, अपेक्षा, ज्ञान, योग, आध्यात्मिकता, प्रेम, विश्वास अशा विविध मानवी भावना दर्शवणारे रंग आणि त्यांची फुले यांचे मिळून आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत.