बांधकाम व्यावसायिकाला दोन जणांनी फोन करून अकरा कोटींची खंडणी मागितल्याची घटना सांताक्रूझ परिसरात घडली आहे. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून ते सांताक्रूझ परिसरात राहतात. गेल्या आठवड्यात सायंकाळी ते घरी होते. तेव्हा त्याना अज्ञात नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने त्याचे नाव सांगून त्याच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर 11 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे देण्यास सांगितले. दोन कोटी कॅशनंतर चार कोटींचे डॉलर आणि आठ किलो सोने देण्यास सांगितले.
जर 11 कोटींची खंडणी दिली नाही तर परिणाम वाईट होतील असे सांगून त्याने फोन कट केला. तक्रारदार याने सुरुवातीला त्या फोनकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांना दुसऱ्या नंबरवरून पुन्हा फोन आला. त्यानेदेखील हिंदुस्थानी चलन आणि डॉलर, सोन्याची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार याने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडल्या प्रकाराची माहिती सांताक्रूझ पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.