मुंबईच्या समुद्रात आज दुपारी भयंकर अपघात झाला. गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे निघालेल्या ‘नीलकमल’ या लाँचला (प्रवासी बोटीला) प्रचंड वेगाने आलेल्या नौदलाच्या स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे प्रवासी बोटीतील अनेक जण समुद्रात फेकले गेले. बोट बुडू लागल्याने बचावासाठी प्रवाशांनी एकच आकांत केला. या घटनेनंतर स्थानिक मच्छीमार बोटी, तटरक्षक दल आणि येलो गेट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. या दुर्घटनेत एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. त्यात 10 प्रवासी तर नौदलाचा एक अधिकारी व दोन कर्मचाऱयांचा समावेश आहे. बोटीतील 101 प्रवाशांना वाचवण्यात यश आले. जखमींना उरणमधील जेएनपीटी, डॉकयार्ड येथील नेव्ही हॉस्पिटल, अश्विनी रुग्णालय, सेंट जॉर्ज आणि करंजा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पथकांचे बचावकार्य सुरू होते.
नीलकमल ही लाँच दररोज गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि परतीच्या प्रवासात प्रवाशांची वाहतूक करते. राजा पडते यांच्या मालकीची ही बोट असून तिची प्रवासी क्षमता 130 इतकी आहे. आज दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया येथून 111 प्रवासी भरून ही लाँच एलिफंटाकडे निघाली. गेट वे ऑफ इंडियापासून 10 किलोमीटर अंतरावर ही लाँच आली असता दुपारी 3.55 च्या सुमारास समोरून प्रचंड वेगात आलेल्या नौदलाच्या स्पीड बोटीने नीलकमल लाँचला जोरदार धडक दिली. या धडकेने नीलकमलमधील काही प्रवासी वेगाने समुद्रात फेकले गेले तर बोट बुडू लागताच बोटीत असलेल्या प्रवाशांनी बचावासाठी आकांत केला. या अपघात प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीडबोटचा चालक आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 56 जखमी प्रवाशांना उरण येथील जेएनपीटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. उपचार सुरू असताना एका प्रवाशाचा मृत्यू झाला.
तटरक्षक, नौदलाची बचाव पथके तातडीने रवाना
तटरक्षक दलाचे डेप्युटी कमांडंट जलाल वत्स यांनी तातडीने बचाव पथक घटनास्थळी रवाना केले. नौदलाचे 4 हेलिकॉप्टर, 11 क्राफ्ट, 1 तटरक्षक नौका आणि येलोगेट पोलीस ठाण्याच्या ‘चैत्राली’, ‘इंद्रायणी’ आणि ‘पंचगंगा’ या तीन सागरी नौका दुर्घटनास्थळी पोहचल्या. स्थानिक मच्छीमार बोटींनीही तातडीने बचावकार्य सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत बोटीतील 101 जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले, मात्र या दुर्घटनेत एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. त्यात 10 प्रवासी आणि स्पीड बोटीतील 3 नौदल कर्मचाऱयांचा समावेश आहे.
‘एनडीके’त दाखल कुणीही वाचले नाही
डॉकयार्ड येथील नेव्हीच्या रुग्णालयात 21 जणांना दाखल करण्यात आले. त्यात एकाचा मृत्यू झाला. अश्विनी रुग्णालयात एका जखमीला दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयात 9 प्रवाशांना दाखल करण्यात आले. तर करंजा येथील रुग्णालयात 12 प्रवाशांना दाखल करण्यात आले. मोरा येथील एनडीके रुग्णालयात 10 अत्यवस्थ प्रवाशांना उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्यातील कोणीही वाचले नाही. या सर्व दहा जणांचा मृत्यू झाला.
नौदलाच्या स्पीड बोटीचे नियंत्रण सुटले आणि होत्याचे नव्हते झाले
नीलकमल बोटीतील काही प्रवासी समुद्रातील नजारा त्यांच्या मोबाईलमधून टिपत होते. यावेळी त्यांना समोरच्या दिशेने घिरटय़ा घालणारी नौदलाची स्पीड बोट दिसली. त्यामुळे त्यांनी मोबाईलमध्ये या स्पीड बोटीची फेरीही टिपली. नीलकमलपासून काही अंतरावर नौदलाच्या स्पीड बोटीने दोन घिरटय़ा मारल्या, मात्र खलाशाचे नौदलाच्या स्पीड बोटीवरील नियंत्रण सुटले आणि काही कळायच्या आत प्रचंड वेगाने ही स्पीड बोट थेट नीलकमलवरच येऊन धडकली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. आसमंत आकांत आणि पिंकाळय़ांनी भरून गेला.
बारा वर्षीय मुलाच्या नातेवाईकांचा थांगपत्ता नाही
बोट दुर्घटनेतून वाचवण्यात आलेल्या 57 जणांना जेएनपीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या मुलाची ओळख अद्याप पटली नसून त्याच्या नातेवाईकांचाही थांगपत्ता लागला नसल्याची माहिती एसीपी अशोक राजपूत यांनी दिली.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची माहिती विधानसभेत दिली. जखमींवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत असे सांगतानाच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. पोलीस व नौदल या घटनेची चौकशी करणार असे त्यांनी सांगितले.
शिवसेना मदतीला धावली
दुर्घटनेनंतर शिवसेना मदतीला धावली. उरणच्या जेएनपीटी रुग्णालयात जखमींना दाखल केल्याचे कळताच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व जेएनपीटीचे कामगार ट्रस्टी दिनेश पाटील शिवसैनिकांसह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची व्यवस्था त्यांनी केली तसेच परतीच्या प्रवासासाठी प्रत्येकी आर्थिक मदतही केली. दरम्यान विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱया 27 जणांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
मृतांची नावे
महेंद्रसिंग शेखावत (नौदल), प्रवीण शर्मा व मंगेश (नौदल बोटीवरील कामगार), मोहम्मद रेहान कुरेशी,
राकेश नानाजी अहिरे,
साफियाना पठाण, माही पावरा (3 वर्षे),
अक्षता राकेश अहिरे,
मिथू राकेश अहिरे
(8 वर्षे), दीपक व्ही.
मृतांत 7 पुरुष, 4 महिला व 2 बालकांचा समावेश आहे.