‘बेस्ट’च्या जीर्ण वसाहती, आगारांमुळे रहिवासी, प्रवाशांच्या जिवाला धोका; काळा किल्ला आगारात सज्जा कोसळला

मुंबईतील 30 लाखांवर प्रवाशांना वाहतुकीची सेवा देण्यासाठी झटणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अनेक जीर्ण वसाहती आणि आगारांमुळे प्रवासी, रहिवासी, कर्मचाऱयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. काळा किल्ला आगारात अभियांत्रिकी विभागात सज्जा कोसळल्याने थोडक्यात टळलेल्या जीवितहानीमुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ‘बेस्ट’ प्रशासनाने जीर्ण वसाहती आणि आगारांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केली आहे.

काळा किल्ला आगार अभियांत्रिकी विभाग येथे इमारतीचा मोठा सज्जा कोसळल्याची घटना नुकतीच घडली. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवित-वित्तहानी झाली नाही. या आगारातील संपूर्ण सज्जा धोकादायक झाला आहे. पैसे नसल्याचे कारण देत आगारांची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. पैसे मिळत नसल्यामुळे पंत्राटदारही टेंडर भरत नाहीत. त्यामुळे आगार व वसाहतींची दुरवस्था झाली आहे. 15 वर्षांपासून याच्या दुरुस्ती-देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पुन्हा या ठिकाणी अशी दुर्घटना घडू नये यासाठी संपूर्ण सज्जाचे पाडकाम करून तातडीने डागडुजी करावी, अशी मागणीही अनिल कोकीळ यांनी केली आहे. दरम्यान, ‘बेस्ट’च्या परळ, सांताक्रुझ, ओशिवरा, भोईवडा, चांदिवली, गोरेगाव, मजास डेपो आदी परिसरात वसाहती आहेत. तर कुलाबा ते मुलुंड-दहिसरपर्यंत तब्बल 27 आगारे आहेत. यात वसाहतींच्या दुरवस्था आणि असुविधांमुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार

वर्षाला कोटय़वधी भाडे घेतात. मात्र तरीदेखील दुरुस्तीसाठी कर्मचारी आणि आवश्यक साहित्य नसल्याचे कारण देत ही दुरुस्ती टाळली जाते. मात्र आगारांच्या दुरवस्थेमुळे कर्मचारी आणि प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत बेस्ट प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही अनिल कोकीळ यांनी दिला आहे.