मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मक्कीचा लाहोरमध्ये मृत्यू

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्दुल रहमान मक्कीचा शुक्रवारी लाहोरमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. मक्की काही दिवसांपासून आजारी होता. शरीरातील साखरेच्या उच्च पातळीमुळे त्याच्यावर लाहोरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. हिंदुस्थानच्या ‘मोस्ट वॉण्टेड’ दहशतवाद्यांच्या यादीत त्याचे नाव होते.

मक्की हा ‘लश्कर-ए-तोयबा’चा संस्थापक हाफिज सईदचा जवळचा नातेवाईक होता, तर ‘जमात-उद-दावा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता. 2020 मध्ये दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवल्याच्या आरोपावरून एका न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आणि सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा झाल्यानंतर त्याने दहशतवादी कारवायांतील सहभाग कमी केला होता. गेल्या वर्षी 2023 मध्ये संयुक्त राष्ट्राने त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले होते.

हिंदुस्थानातील अनेक हल्ल्यांच्या कटात सहभाग

2000 मध्ये लाल किल्ल्यावर झालेला हल्ला, 2008 मध्ये मुंबईतील ताज हॉटेलवर झालेला हल्ला, रामपूरमध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला, 2018 मध्ये श्रीनगर येथील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला अशा विविध हल्ल्यांच्या कटात मक्कीचा सक्रिय सहभाग होता. अमेरिकेच्या अर्थ विभागाने 2010 मध्ये जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत मक्कीचे नाव समाविष्ट केले होते. अमेरिकेने त्याचा शोध घेणाऱ्याला 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.