प्रदूषणाचा आपातकाल; बोरिवली, भायखळ्यात बांधकामांवर बंदी, 286 प्रकल्पांना नोटीस

मुंबईत प्रदूषणाची आपत्कालीन स्थिती निर्माण झाली असून पहिले कठोर पाऊल उचलत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्वाधिक प्रदूषित भायखळा, बोरिवली पूर्वमधील सर्व प्रकारची बांधकामे 24 तासांत ‘सेफ स्टेज’मध्ये आणून तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. वरळी, नेव्हीनगर कुलाब्यातही हवेची गुणवत्ता खालावल्याने या ठिकाणच्या बांधकामांबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. शिवाय मुंबईतील सर्व बांधकामांची झडती घेण्यात आली असून 286 बांधकामांना ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसनंतरही संबंधित ठिकाणी काम सुरू असल्याचे आढळल्यास ‘एमआरटीपी’ कायदा – कलम 52 नुसार थेट पोलिसांत अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येणार आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली असून प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे. यामध्ये हवेच्या गुणवत्तेचा ‘एअर क्वालिटी निर्देशांक’ दररोज 200च्या वर म्हणजेच ‘खराब’ स्थितीत राहत असल्यामुळे पालिकेने कठोर निर्णय घेतले आहेत. याबाबत आज पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पत्रकार परिषद घेत पालिका करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मुंबई आणि महानगरामध्ये वाढणाऱया प्रदूषणाबाबत उपाययोजनांबाबत कार्यवाही करण्यासाठी ‘मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू आहे. बोरिवली पूर्वमध्ये हवेची गुणवत्ता सातत्याने खालावलेली दिसत असल्यामुळे या ठिकाणची बांधकामे, प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या वेळी अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, विपीन शर्मा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे उपस्थित होते.

28 प्रकारची नियमावली

मुंबईत सुमारे 2200 खासगी बांधकामे आणि प्रत्येक वॉर्डमध्ये सुमारे 50 ते 60 बांधकामे सुरू आहेत. या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण नियमावली पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी 28 प्रकारचे नियम जाहीर करण्यात आली आहे. बांधकामे 25 फूट उंचीच्या हिरव्या कापडाने, ताडपत्रीने बंदिस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

अशा होताहेत उपाययोजना

  • बांधकाम, प्रकल्प कंत्राटदारांना पर्यावरण व्यवस्थापन योजना राबवणे बंधनकाक.
  • वायूप्रदूषण रोखण्यासाठी ‘मुंबई वायूप्रदूषण शमन आराखडय़ा’ची अंमलबजावणी.
  • प्रदूषणकारी 77 बेकऱ्या बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
  • सर्व स्मशानभूमी पीएनजी किंवा विद्युतवर चालणाऱया करण्याची कार्यवाही सुरू.
  • बेस्टमध्ये येणाऱया सर्व बस प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिकवर चालणाऱया आणणे.
  • रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी 106 टँकर्सच्या माध्यमातून रस्ते धुण्याची कार्यवाही.

तर उद्योगही बंद करणार

पालिकेच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र या उपाययोजना करूनदेखील ज्या ठिकाणचा एक्यूआय 200 पेक्षा जास्त राहील अशा ठिकाणी त्या परिसरातील उद्योग आणि बांधकामेदेखील बंद करण्यात येतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अशी ठरते हवेची गुणवत्ता

हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ‘एक्यूआय’ तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत ‘एक्यूआय’ ‘अतिशय शुद्ध हवा’ मानली जाते. तर 51 ते 100 दरम्यान ‘एक्यूआय’ – ‘समाधानकारक हवा’, 101 ते 200 दरम्यान ‘एक्यूआय’ – ‘मध्यम दर्जाची हवा’, 201 ते 300 पर्यंत ‘एक्यूआय’ – ‘खराब’ हवा समजली जाते. तर 301 ते 400 ‘एक्यूआय’ – ‘अतिशय खराब’ तर 401 ते 500 ‘एक्यूआय ’ असल्यास ‘हवेची स्थिती गंभीर’ असल्याचे मानले जाते.

खोदकामाला बंदी

खोदकामातून उडणाऱया धुळीमुळेदेखील प्रचंड प्रदूषण वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईत प्रदूषण कमी होईपर्यंत खोदकामाला बंदी घालण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

32 ठिकाणी एअर क्वालिटी मॉनेटरिंग

मुंबईत हवेच्या गुणवत्तेची माहिती मिळण्यासाठी 32 ठिकाणी एअर क्वालिटी मॉनेटरिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. याच्या माध्यमातून व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. या संयंत्राची संख्या 50हून जास्त करण्यात येणार आहे.

‘आरएमसी’ प्लांटना परवानगी नाही

प्रदूषण कमी होईपर्यंत मुंबईत कुठल्याही नव्या आरएमसी प्लांटला परवानगी देण्यात येणार नाही. हे आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांट आता मुंबईबाहेर सुरू करता येणार आहे. शिवाय मुंबईतील आरएमसी प्लांट संपूर्णपणे बंदिस्त करण्याची कार्यवाहीदेखील करण्यात येईल.