
पावसाळय़ात उघडय़ावर स्वच्छता न ठेवता दूषित खाद्यपदार्थ विकून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱया अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिका आणि पोलिसांची कारवाई सुरूच असून आतापर्यंत 538 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उच्च न्यायालय भागासह कुर्ला, दादर, बोरिवली भागातील अत्यंत वर्दळीचे परिसर फेरीवालामुक्त केले आहेत.
पावसाळय़ात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिकेने सुरू केलेली कारवाई आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. महापालिकेच्या विविध विभाग कार्यालयाच्या (वॉर्ड) वतीने 28 ते 30 जून या तीन दिवसांच्या कालावधीत वर्दळीच्या विविध परिसरात अधिक लक्ष केंद्रित करून सुमारे 538 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान अनधिकृतपणे व्यवसाय मांडलेल्या फेरीवाल्यांकडून मोठय़ा प्रमाणात हातगाडी, भरलेली गॅस सिलिंडर्स यासह इतर साधनसामग्री जप्त करण्यात आली.
मुंबईकरांची गैरसोय टळणार
मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने नियमितपणे पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणारे फेरीवाले, पथारीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात येते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
अशी झाली कारवाई
‘ए’ विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उच्च न्यायालय, चर्चगेट ते उच्च न्यायालय, कुलाबा कॉजवे या परिसरातील 35; ‘बी’ विभागातील मोहम्मद अली, टिळक मार्ग परिसरातील 31; एफ (दक्षिण)च्या लालबागमध्ये 13; जी (उत्तर)च्या दादर रेल्वे स्थानकात 220; एच (पश्चिम)च्या जोड (लिंक) मार्ग, हिल मार्ग 68; के (पश्चिम)च्या अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ 62; आर (दक्षिण) विभागातील मथुरादास मार्ग परिसरातील 35; आर (मध्य) विभागातील बोरिवली रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरातील 40; एल विभागातील कुर्ला रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरातील 34 अशी एकूण 538 फेरीवाल्यांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.