
भांडुपमध्ये अपघाताची थरारक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत आईस्क्रीम आणायला चाललेल्या 33 वर्षीय तरुणाला चालकविरहित ट्रकने चिरडले. अपघातात गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. साजिद आझमी असे मयत तरुणाचे नाव आहे.
साजिद आपले दोन मित्र शाहरुख चौधरी आणि जैद शेख यांच्यासोबत मंगळवारी रात्री बाईकवरून आईस्क्रीम आणण्यासाठी चालला होता. एलबीएस मार्गावरील मेट्रो रेल्वे पुलाखाली विरुद्ध बाजूने येणाऱ्या चालकविरहित ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली.
ट्रक धडकण्यापूर्वीच साजिदच्या दोन्ही मित्रांनी बाईकवरून उडी घेतली. मात्र दोघांच्या मध्ये बसलेला साजिदचा पाय बाईकखाली अडकल्याने स्वतःचा बचाव करण्यास अयशस्वी झाला. यामुळे तो ट्रकखाली चिरडला गेला. मित्रांनी तात्काळ साजिदला क्रिटी केअर रुग्णालयात नेले.
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्री साजिदचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साजिद भांडुप पश्चिम येथील पठाण कॉलनीत कुटुंबासह राहत होता. एका खाजगी फर्ममध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून तो काम करत होता.