मुंबईकरांचे 500 कोटी धुळीत! वारेमाप खर्च करुनही धूळ कायम; शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ होत असून दक्षिण मुंबईसह शहरात सर्वत्र अतिशय खराब हवा नोंदवली गेली आहे. शहरात हवेची गुणवत्ता खालावली असल्याने मुंबईच्या चिंतेत वाढ होत आहे. त्यामुळे सरकार आता वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींचा खर्च केला. तो धुळीत गेल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी म्हटले आहे. या मुद्द्यावरून शिवसेनेने सरकारवर हल्लाबोल केला आहे.

याबाबत शिवसेनेच्या अधिकृत एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, मुंबईकरांचे 500 कोटी धुळीत! प्रदूषण कमी करण्यासाठी मिंधे सरकारच्या काळात सुरु केलेल्या स्वच्छता अभियानासाठी खरेदी केलेल्या विविध साहित्य, साधनांवर पालिकेने वर्षभरात सुमारे 500 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. महापालिकेने गेल्या वर्षभरापासून हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत पाण्याचे टँकर भाडेतत्त्वावर घेणे, धूळ कमी करण्यासाठी मिस्टिंग मशिनची खरेदी, यांत्रिकी झाडू खरेदी करणे किंवा भाडेतत्वावर घेण्यासह इतर साधनसामुग्रीसाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च केल्यावरही जर प्रदूषण कमी होत नसेल तर मुंबईकरांचे 500 कोटी धुळीत गेले असेच म्हणावे लागेल, असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुंबईत थंडी वाढत असतानाच हवेचे प्रदूषण वाढण्यास सुरुवात झाली असून घशाच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. मुंबईत एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ही हवा ‘अतिशय खराब’ म्हणून नोंदवली गेली आहे. शिवाय वरळी, माझगाव, शिवडी आणि शिवाजीनगर या ठिकाणीदेखील एक्यूआय 200 ते 300 दरम्यान, म्हणजेच ‘खराब’ हवा असा नोंदवला गेला आहे. हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ‘एक्यूआय’ तपासला जातो. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांची प्रचंड घुसमट होत आहे. संपूर्ण शहरभर विषारी धुरक्याचे साम्राज्य पसरले आहे. या धुरक्यामुळे शेजारच्या इमारतीही दिसेनाशा झाल्या आहेत. हवेची गुणवत्ता ‘प्रचंड खराब’ पातळीवर नोंद झाली. बोरिवली पूर्वेकडे सर्वाधिक प्रदूषित हवा होती. तिथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक 270 इतका नोंद झाला. वाढत्या प्रदूषणावर आरोग्य व पर्यावरणतज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मिंधए सरकारच्या काळात तब्बल 500 कोटी रुपये खर्ट करण्यात आले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईकरांचे खर्च केलेले 500 कोटी रुपये धुळीत गेल्याचे दिसत आहे, असा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे.