सात पिस्तूल, 21 जिवंत काडतुसं अन् निशाण्यावर सेलिब्रिटी; मुंबईतून 5 शार्प शुटर्सला अटक, पोलिसांचा खळबळजनक खुलासा

फाईल फोटो

मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने अंधेरी भागातून 5 जणांना अटक केली आहे. अटक केलेले सर्व शार्प शूटर्स असून देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून ते मुंबईमध्ये आले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 7 पिस्लूत, 21 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. प्राथमिक चौकशीमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या निशाण्यावर मुंबईतील सेलिब्रिटी असल्याचे समोर आले आहे. ‘लोकमत टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले असून यामुळे एकच खळबळ उडाली.

विकास ठाकूर उर्फ विकी, सुमीत कुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेक गुप्ता अशी पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. हे आरोपी राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशहून मुंबईत आले होते. अटक केलेल्यांपैकी सुमीतकुमार आणि विकास यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अंधेरी भागातून आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्यार घेऊन त्यांना कुणी पाठवले? त्यांचा इरादा काय होता? त्यांच्या हिटलिस्टवर नक्की कोण-कोण होते? याचा खुलासा पोलीस चौकशीत होण्याची शक्यता आहे. तसेच पोलीस वेगवेगळ्या राज्यांतील पोलिसांशीही संपर्क साधून आरोपींची माहिती घेत आहेत.