मुंबईतील दीडशेहून अधिक पोलीस निरीक्षक हद्दपार, मुंबई पोलीस दल रिकामे; कायदा व सुव्यवस्था बिघडणार

ऐन निवडणुकीत राज्य शासनाने पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या केल्या जात असल्याचे सांगितले जाते. पण त्याचवेळी मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेचे सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यावर मात्र मेहेरबानी दाखवली जात आहे. चौधरीदेखील बदलीसाठी पात्र असताना त्यांना मात्र सांभाळून घेतले जात असल्याने पोलीस दलात संतापाची लाट पसरली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस निरीक्षकांच्या घाऊक बदल्या करण्यात आल्या. तब्बल 333 पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा बदलीचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काढण्यात आले. ऐन निवडणुकीत दीडशेहून अधिक मुंबईतील अधिकाऱयांना बाहेर पाठविण्यात आले आहे. मुळात मार्च महिन्यात या बदल्या होणे अपेक्षित होते, पण तेव्हा तसे झाले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर तरी बदल्या करणे गरजेचे होते, पण दळभद्री सरकारने तेही केले नाही. आता ऐन निवडणुकीत खऱया अर्थाने मुंबईची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम करणाऱया दीडशेहून अधिक पोलीस निरीक्षकांना मुंबईतून हद्दपार केले आहे. पण हा न्याय सहआयुक्त चौधरी यांच्याबाबत दाखवलेला नाही. सत्यनारायण चौधरी हेदेखील बदलीस पात्र आहेत. पण त्यांना मात्र अभय देण्यात येत आहे. वरिष्ठांवर मेहरबानी आणि कनिष्ठांना सापत्न वागणूक असे का, असा सवाल विचारला जात आहे. आज मुंबई पोलीस दल रिकामे केल्याने कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.