
मुंबईला अडाणी सिटी करू पाहणाऱ्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उदाहरण त्यांच्या डोळय़ासमोर आणावे. मराठी माणूस एकवटला तर अनेक जणांच्या डोक्यात जो अहंकार घुसला होता तो कसा उधळून लावला आणि मुंबई कशी वाचवली हे लक्षात ठेवावे.
धारावीकरांना पात्र-अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकवून हाकलवून देण्याचा डाव आहे. पण एकाही धारावीकराला इथून जाऊ देणार नाही. आम्ही प्रत्येक धारावीकराच्या मागे उभे राहू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मुंबईची गिफ्ट सिटी गुजरातला पळवून नेली आहे आणि आता मुंबईला अडाणी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे. कदाचित हे उद्या मुंबईचे नावही बदलतील आणि मुंबईचे अडाणी सिटी करतील. पण हा आम्ही हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले. धारावीकरांना पाचशे स्क्वेअर फुटांची जागा आणि त्याच ठिकाणी पुनर्वसन ही शिवसेनेची मागणी काल होती, आजही आहे आणि उद्याही राहील, असे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली संपूर्ण मुंबई ही उद्योगपती अदानी यांच्या घशात घालण्याचा डाव केंद्र व राज्य सरकार रचत असल्याचे पुढे आले आहे. सरकारचा हा कट उधळून लावण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते विनोद घोसाळकर माजी आमदार बाबुराव माने उपस्थित होते.
धारावीकरांना हाकलवून देण्याचा प्रयत्न
आता सर्वेक्षणाच्या नावाखाली सर्व घरांना नंबर देत आहेत असे सांगून ते पुढे म्हणाले की, धारावीकरांना पात्र-अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकवून हाकलवून देत आहे. पण एकाही धारावीकराला इथून जाऊ देणार नाही. आम्ही प्रत्येक धारावीकराच्या मागे उभे राहू. पात्र-अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आणि मग रिकामी केलेली ही धारावी अदानींच्या घशात अलगद जाईल. मग पुन्हा भूखंडाचे श्रीखंड ओरपायला हे सर्व जण तयार आहेत.
काहींच्या मानसिकतेला बुरशी
धारावीकरांना बाहेर काढण्याची ही सर्व जी काही कारस्थाने आहेत ते म्हणजे मुंबईचे नागरी संतुलन बिघडवण्याचा हा डाव आहे. मानसिक संतुलन बिघडणे बोलतो आणि मानसिक संतुलन बिघडलेली माणसे काय करतात हे सर्वांना माहिती आहे. काही जणांच्या मानसिकतेलाही बुरशी आलेली आहे. त्यामुळे अशी सर्व माणसे आहेत. ती याच्या मागे आहेत, असा आरोप त्यांनी केला.
फसव्या घोषणांना बळी पडणार नाही
राज्य सरकारने अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ आणि नंतर ‘लाडका भाऊ’ या योजना जाहीर केल्या. त्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका डोळय़ासमोर ठेवून हे महाबिघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पाडायला निघाले आहे. त्यांना असे वाटते की, त्यांनी आतापर्यंत जो काही कारभार केला आहे त्या सगळय़ा कारभाराचा विसर पडून ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ’ अशा फसव्या घोषणांना बळी पडून मतदान करेल अशी वेडी आशा त्यांना आहे, असा टोलाही त्यांनी मारला.
अदानींना बेसुमार टीडीआर
धारावीचा विचार केला तर धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही, तर ती औद्योगिक झोपडपट्टी आहे. येथील प्रत्येक घरात लघुउद्योग आहे. त्यात कुंभार, इडली उद्योग, चर्मोद्योग, वस्त्रोद्योग, कुंचीकोरवे आहेत. धारावीतल्या या उद्योगधंद्याचे काय करणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. अदानींना बेसुमार टीडीआर द्यायचा डाव आहे आणि आम्ही तो उधळून लावणार आहोत. तो कधीही यशस्वी होऊन देणार नाही. मुंबईभर अदानींकडून टीडीआर विकत घेतला पाहिजे ही जबरदस्तीची अट त्यामध्ये टाकली आहे. त्या विरोधात आम्ही दंड थोपटले आहेतच. मात्र गेल्या आठवडय़ात काही बातम्या आल्या त्या पाहिल्यानंतर या योजनांच्या फसव्या धुरळय़ामागे त्यांच्या कंत्राटदार मित्राचे कसे ते चांगभलं करू इच्छितात हे दिसते. अदानींना बेसुमार टीडीआर देण्याच्या विरोधात शिवसेनेने विशाल महामोर्चा काढला होता, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी यावेळी करून दिली.
पायाभूत सुविधांच्या जागाही अदानींच्या ताब्यात
धारावीच्या पुनर्विकासाच्या योजनेवर बोलताना ते म्हणाले की, धारावीचा पुनर्विकास करताना मूळ योजना अशी होती की, धारावीकरांना संक्रमण शिबिरात न पाठवता रेल्वेच्या जमिनीवर घरे बांधायची होती. कारण धारावीच्या प्रत्येक घरात उद्योग आहेत. त्याची रोजीरोटी त्या उद्योगावर आहे. जर त्यांना संक्रमण शिबिरात किंवा मिठागरांच्या जमिनीवर हलवले तर पायाभूत सुविधा कोण देणार? अदानी त्यांना देणार का? दहिसरच्या टोलनाक्यावर हलवले तर काय पायाभूत सुविधा देणार? दहिसरच्या टोलनाक्यावर तर आम्ही बस टर्मिनल मागत आहोत. मुलुंडच्या टोलनाक्यावर हलवले तर पायाभूत सुविधा काय देणार? मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी जे प्रकल्प आहेत तेथील जागा या अदानीच्या घशात घालायच्या, असा आरोपही त्यांनी केला.
धारावीकर पुन्हा झोपडपट्टीत
धारावीचा टीडीआर काढणार आणि पुन्हा मिठागरे, टोल नाके, कुर्ला डेअरी अशी वीस जागांचा टीडीआर काढणार, कारण तिथे गेल्यावर ती जागा काही अदानी सोडणार नाही. धारावीतल्या झोपडपट्टीधारकांना पात्र अपात्रतेचा निकष लावून मिठागरे किंवा पुन्हा झोपडपट्टीत फेकणार मग धारावी तुम्ही अदानीच्या घशात घालणार असा आरोपही त्यांनी केला.
धारावीचे टेंडर रद्द करा
धारावीच्या एकूण टेंडरचा अभ्यास केला तर या 189 पानांच्या या टेंडरमध्ये कुठेही तुम्ही देऊ केलेल्या सोयीसुविधांचा उल्लेख नाही. म्हणजे फसवणूक आहे. इतरांनी या टेंडरमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्यापैकी जर कोणी कोर्टात गेले तर कंत्राट रद्द होऊ शकते. आमचे एकच म्हणणे आहे अदानींसाठी जर तुम्ही मुंबईची विल्हेवाट लावणार असाल तर धारावीचे टेंडर रद्द करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
पुन्हा आंदोलनाची वेळ आली आहे
आमची जाहीर मागणी आहे की, अदानींना झेपत नसलेल्या कामाचे टेंडर रद्द करून दुसऱ्या योग्य माणसाला द्यावे. त्याच्यासाठी जागतिक पातळीवरील टेंडर मागवा. अनेक जण येऊ शकतील. हा धारावीकरांना आणि मुंबईकरांना उद्ध्वस्त करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही आणि पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
भविष्यात तुमचे सरकार आले तर पुन्हा हे टेंडर रद्द करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबवून धारावीकरांना काही नवीन देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, आमचे धारावीकरांना वचन आहे की, तुम्हाला धारावीतच तुमच्या हक्काचे घर देऊ, घरातील उद्योग, रोजीरोटी आहे त्याचीही व्यवस्था त्याच जागेत करून देऊ. त्यांच्यासाठी उद्योगाची वसाहत बांधू. धारावी झोपडपट्टी होती तिथे धारावी स्मार्ट सिटी करू शकतो. यापूर्वीचे टेंडर आम्ही रद्द केले होते. नवीन टेंडर आमच्या काळात निघालेले नव्हते. आमच्या काळात निघाले असते तर ज्या काही अटी-शर्ती घातलेल्या होत्या त्याचप्रमाणे विकास केला असता. कंत्राटदाराला अधिकच्या सोयीसुविधा देणार नाही. धारावीकरांचे हित बघू मग गरज असेल तर नवीनसुद्धा टेंडर करू, असे ते म्हणाले. पण आता हे टेंडर रद्द का करण्यात येऊ नये याचे उत्तर या सरकारने दिले पाहिजे. धारावीकरांवर अन्याय करून मुंबईची अदानी सिटी कोणत्याही परिस्थिती होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
वाढीव टीडीआरची मेहेरनजर
अदानींना नजरेसमोर ठेवून टेंडरमध्ये दिले जात असल्याच्या प्रकाराचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, धारावीचे टेंडर अदानींना दिले गेले तेव्हा टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी आज ते देऊ करीत आहेत. म्हणजे वारेमाप एफएसआय देत आहेत. मुळात धारावीचा प्रकल्प पाहिला तर 590 एकरचा हा भूखंड आहे. त्यातील 300 एकर हा गृहनिर्माणासाठी आहे. मग बाकीचा जो भूखंड आहे त्यात माहीम नेचर पार्क, टाटा पॉवरचे रिसिव्हिंग स्टेशन आहे. एकूण टेंडरमध्ये जर बघाल तर कुठेही वाढीव टीडीआरचा उल्लेख नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वीस जागांवर डोळा
धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अधिकची जमीन मागण्याची योजना असल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेला तपशील सादर केला. ते म्हणाले की, धारावीत पात्र- अपात्र ठरवताना त्यांची संख्या एवढी वाढवायची की आता त्याच्यामध्ये प्रकल्प होऊ शकत नाही. मग अधिकची जागा मागतील. ही अधिकची जागा कशी घेणार याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, कुर्ला येथील मदर डेअरी, दहिसर आणि मुलुंडचा टोल नाका, मुंबईची मिठागरांची जागा मागतील. आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली तेव्हा वीस जागा असल्याची माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
पाचशे चौरस फुटांचे घर मिळाले पाहिजे
धारावीकरांना मिठागरे किंवा अन्यत्र कुठेही टाकता येणार नाही. जर अदानींना जमत नसले तर अदानींनी सांगावे की, हे जमत नाही. त्यांनी टेंडर सोडून द्यावे. पुन्हा टेंडर काढा. धारावीकरांना पाचशे चौरस फुटांचे घर मिळालेच पाहिजे, त्यांच्या उद्योगाची सोय झाली पाहिजे ही आमची आग्रही मागणी असल्याचे ते म्हणाले.
धारावीचा आराखडा कुठे आहे?
मुळात धारावी कशी विकसित होणार याचा आराखडा कोणाला माहिती आहे का? अचानक हे सरकार लाडक्या मित्रासाठी वेगवेगळय़ा ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहित करायला लागले आहेत. हा काय प्रकार आहे? मुंबईचे इतर प्रकल्प होणार आहेत त्या प्रकल्पांना का नख लावत आहात? अगदी वाघनखं नसली तरी सरकारी नखे का लावत आहात, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
लाडका मित्र, लाडका कंत्राटदार, लाडका उद्योगपती
धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल बोलताना ते म्हणाले की, लाडका मित्र किंवा लाडका कंत्राटदार किंवा लाडका उद्योगपती योजना म्हणजे धारावी पुनर्विकासाची योजना. या योजनेच्या विरोधात आम्ही धारावीत गेल्या वर्षी मोठा मोर्चा काढला होता. धारावीकरांना त्यांच्या हक्काचे घर धारावीतच मिळाले पाहिजे. धारावीकरांना पाचशे चौरस फुटांचे घर मिळाले पाहिजे ही शिवसेनेची आग्रही भूमिका कालही होती, आजही आणि उद्याही राहणार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अदानींच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव शिवसेना उधळून टाकेलच, पण तमाम मुंबईकरांनी हा डाव उधळून लावावा. मुंबई उद्ध्वस्त करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे.