
शेअर मार्केटमध्ये झालेला लाॅस तसेच पुन्हा पैसे गुंतविण्यासाठी एका तरुणाने शाळा केली. कंपनीचे पैसे घेऊन जात असताना अज्ञातांनी लुटले अशी तक्रार पोलिसांत केली. पण मुलुंड पोलिसांनी प्रश्नांचा भाडीमार करताच त्याची बोबडी वळली आणि आपणच गुन्हा केल्याची कबूली दिली.
20 जानेवारीच्या संध्याकाळी अमित गुप्ता (21) हा तरुण मुलुंड पोलीस ठाण्यात गेला आणि वीर संभाजीनगर पाईप लाईन परिसरात अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवत माझ्याकडील कंपनीची 85 हजार रुपयांची रोकड हिसकावून नेली, अशी तक्रार त्याने दिली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश मोहिते व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. मोहिते यांनी अमितकडून घटना समजून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रकरणात गडबड असल्याचे जाणवले. कारण अमितच्या सांगण्यात विसंगती दिसून येत होती. त्यामुळे मोहिते यांनी कौशल्याने प्रश्नांचा भडिमार करताच अमित त्यात फसला आणि त्याने लुटमारीचा बनाव केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून सर्व रक्कम हस्तगत केली.
डोकं लढवल पण….
पाईप लाईन परिसरात सीसीटिव्ही नाही. शिवाय त्या परिसरात वर्दळही नाही. हे बघून अमितने त्या परिसरात मला लुटल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तेथे जाऊन तपास केला तरी खरं काय ते समजू शकणार नाही असा अमितने विचार केला होता. पण मुलुंड पोलिसांनी त्याची चालबाजी अचुक हेरून त्याला बेड्या ठोकल्या.