ऑनलाईनवरून जेवणाची थाळी बुक करणे वृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. थाळी बुकिंगच्या नावाखाली ठगाने वृद्धाची फसवणूक केली आहे. फसवणूकप्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. पुढील आठवडय़ात तक्रारदार याच्या पत्नी आणि त्याच्या मैत्रिणीचा एक कार्यक्रम मुलुंड येथील एका मॉलमध्ये होणार होता. कार्यक्रमादरम्यान जेवणाची सोय म्हणून त्याने मुलुंड येथील एका हॉटेलचा नंबर ऑनलाईन सर्च केला. तेथे त्याना एक नंबर दिसला. त्यावर कॉल केला असता ठगाने त्याचा क्रेडिट कार्ड आणि सीव्हीसी नंबर विचारला. काही वेळाने त्याच्या खात्यातून एक हजार रुपये गेले. तुमचे अॅडव्हान्सचे पैसे जमा झाले आहेत. तुमच्या कार्डवरून ती माहिती काढून टाकण्यासाठी एक ओटीपी येईल असे भासवले. काही वेळाने त्याना एक ओटीपी आला. तो ओटीपी त्याने शेअर केला. ओटीपी शेअर करताच खात्यातून 1 लाख 37 हजार रुपये गेले.