मुलुंड बीएमडब्ल्यू ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणातील आरोपी शक्ती अलग याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शक्तीला आज मुलुंड कोर्टात हजर करण्यात आले होते.
4 सप्टेंबरच्या पहाटे मुलुंडच्या गव्हाणपाडा येथे भरधाव बीएमडब्ल्यू कारने गणपती मंडळाचे काम करत असलेल्या दोघा तरुणांना धडक दिली होती. त्यात प्रीतम थोरात या तरुणाचा नाहक जीव गेला तर प्रसाद पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला. प्रसाद मुलुंडच्या ज्युपिटर इस्पितळात उपचार घेत आहे. दरम्यान हा अपघात करून पळालेल्या शक्ती अलग या मुजोर चालकाला नवघर पोलिसांनी 16 तासांनी पकडले. त्यावेळी त्याला न्यायालयात हजर केले असता 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्या कोठडीची मुदत आज संपल्याने शक्तीला मुलुंड कोर्टात हजर करण्यात आले होते. तेव्हा कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून शक्तीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
दरम्यान, गंभीर जखमी प्रसादाचा अद्याप जबाब पोलिसांना घेता आलेला नाही. त्यामुळे प्रसादची तब्येत सुधारल्यावर त्याचा रितसर जबाब घेऊन त्यात काही वेगळय़ा बाबी आढळून आल्यास शक्तीला चौकशीसाठी पुन्हा ताबा घेऊ असे पोलिसांचे म्हणणे आहे. तसे प्रावधान नवीन कायद्यात असल्याचे अॅड. संदीप सिंग यांनी सांगितले.
तोतया पोलीस गजाआड
पोलीस असल्याचे भासवून 5 लाख रुपये घेऊन पळालेल्या तोतया पोलिसांना अखेर खार पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. संदेश मालाडकर, विकास सुर्वे, प्रफुल मोरे, चेतन गौडा आणि दर्शन याग्निक अशी त्याची नावे आहेत. सुर्वे हा मुख्य सूत्रधार आहे. त्याला एकाने पैशाबाबत टीप दिली होती. या गुह्यात एक जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तक्रारदार हे वकील असून त्यांच्या चुलत भावाचा मनी ट्रान्स्फरचा व्यवसाय आहे. गेल्या रविवारी सकाळी पैसे भरण्यासाठी खार 16 वा रोड येथील एका सरकारी बँकेच्या एटीएममध्ये ते गेले होते. सुरुवातीला त्यांनी 70 हजार रुपये खात्यात भरले. उरलेले पाच लाख रुपये ते खात्यात भरणार होते. अचानक दोन जण तेथे आले. त्यांनी ते गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे भासवले. चौकशी करायची असल्याने सोबत चल असे सांगून त्यांना बाहेर येण्यास सांगितले. तक्रारदारांना गाडीत बसण्यास सांगितले. काही अंतर गेल्यावर ठगाने तक्रारदार यांना सांताक्रुज परिसरात आणले. त्यानंतर ती पैशाची बॅग घेऊन ठग हे पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपींना पकडले.