आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू विविध कारणांनी चर्चेत असते. जागतिक आश्चर्यांमध्ये समावेश असलेल्या या वास्तूवर संततधार पावसानंतर अनेक तडे पडले आहेत. इंडिया टुडेनं यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यांच्याकडे असलेल्या व्हिडीओंमध्ये ताजमहालच्या भिंती, वरचा मजला आणि इतर महत्त्वाच्या भागांना तडे गेले आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ताजमहालच्या बाहेर एक रोप उगवताना दिसत आहे.
या मुद्द्याबद्दल बोलताना, हिंदुस्थानच्या पुरातत्व विभागाचे आग्रा मंडळाचे अधीक्षक राजकुमार पटेल म्हणाले की, प्रत्येक स्मारकाच्या कोपऱ्यांवर झाडे वाढतात आणि ती आठ ते दहा दिवसांत ‘रूट किलर आणि कीटकनाशके’ देऊन काढून टाकली जातात.
‘फक्त ताजमहालच नाही, तर स्मारकांच्या सर्व सांध्यांमध्ये धूळ साचली आहे, तिथे पाण्याशी संपर्क आहे, पक्षीही तिथे बसतात. सर्व स्मारकांमध्ये तुम्हाला झाडे उगवताना दिसतील. जेव्हा ती छोटी छोटी झाडे असतील तेव्हा पाने काढून टाकली पाहिजेत. जर झाडे 5-8 सेमी वाढली तर त्यांची मुळे घुसतील आणि स्मारके खराब होतील आणि 8-10 दिवसात आम्ही त्यांना काढून टाकतो आणि आम्ही पॉइंटिंग करतो पुन्हा’, अशी माहिती पटेल यांनी दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.