
आयसीसी महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना मोहालीच्या मुल्लानपूर गावातील महाराजा यादविंद्र सिंह स्टेडियमवर होणार आहे. क्रिकेटवरील एका संकेतस्थळाच्या हवाल्यानुसार हिंदुस्थानात होणारी ही प्रतिष्ठेची आयसीसी स्पर्धा 29 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबरदरम्यान खेळविली जाणार आहे. हिंदुस्थान चौथ्यांदा महिला वन डे वर्ल्ड कपचे आयोजन करणार असून मुल्लानपूरसह इंदूर, रायपूर, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम या पाच मैदानांवर आठ संघांमध्ये ही स्पर्धा खेळविली जाणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन सामना विशाखापट्टणमला खेळविला जाणार असल्याचे दोन दिवसांपूर्वीच बीसीसीआयने निश्चित केले होते. या स्पर्धेतील मुल्लानपूर, तिरुवनंतपुरम आणि रायपूर स्टेडियमवर आजवर महिलांचा एकही आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आलेला नाही. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका हे संघ पात्र ठरले आहेत. स्पर्धेतील दोन संघ अजून निश्चित व्हायचे असून येत्या 9 एप्रिलपासून लाहोर येथे पात्रता फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ पात्र ठरला तर त्याचे सामने यूएई किंवा श्रीलंका येथे खेळविले जातील.