
भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोटात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची वाढीव आवक सुरू झाली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 4013 दलघफू (36.35 टक्के) झाला होता, तर 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. काल दिवसभर पडलेल्या पावसाची भंडारदरातील नोंद 5 मि.मी. झाली.
भंडारदरा परिसरात पाऊस सुरू असल्याने निळवंडे धरणात नवीन पाणी येत आहे. या धरणात काल 1323 दलघफू पाणीसाठा झाला होता.
सकाळी मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 4705 क्युसेक, तर सायंकाळी 3416 क्युसेक होता. धरणाचा पाणीसाठा 7794 दलघफू (30 टक्के) झाला आहे. दोन्ही धरणांच्या पाणलोटात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने भातखाचरामध्ये पाणी साठू लागल्याने भात आवणीच्या कामाने पुन्हा वेग घेतला आहे.