लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये ‘तांत्रिक’ खोडा; 15 टक्के अर्ज होणार बाद

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त आतापर्यंत एक कोटी महिलांनी नोंदणी केलेली आहे. पुढील महिन्यापर्यंत दोन कोटी पन्नास लाख महिलांची नोंदणी अपेक्षित आहे. पण त्यातील 10 ते 15 टक्के अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद होण्याची शक्यता आहे. नोंदणी केलेल्या महिलांमध्ये 60 टक्के महिला या विवाहित आहेत. नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै व ऑगस्ट असा दोन महिन्यांचा निधी जमा होणार आहे.

या योजनेसाठी अर्थसंकल्पात 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आहे. पहिल्या टप्प्यासाठी दहा हजार कोटी रुपये या योजनेसाठी संबंधित विभागाला देण्यात आलेले आहेत. नोंदणी केलेल्या महिलांमध्ये 60 टक्के महिला या विवाहित आहेत. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक नोंदणी झालेली आहे. त्याखालोखाल ठाणे आणि नगर जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी झालेली आहे. परराज्यातून लग्न करून महाराष्ट्रात आलेल्या महिलांनी त्यांचे लग्नाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांना सांगितले.

या योजनेतील सर्व कागदपत्रे जमा झाल्याशिवाय अर्ज संगणकाद्वारे अपलोड न करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे छाननीमध्ये जास्त अर्ज बाद होणार नाहीत. छाननी पूर्ण झाल्यावर पात्र लाभार्थी महिलांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.