‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकच जाहिरात विविध पद्धतीने छापण्याचा सपाटा सुरू झाला आहे. मात्र हे सर्व सुरू असताना जाहिरातीत अर्थमंत्री अजित पवार कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी महायुतीत लढाई सुरू आहे, असा खोचक टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला. विधान परिषदेत सत्ताधाऱयांच्या 260 च्या स्थगन प्रस्तावावर ते बोलत होते. अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. योजनेचा दुसऱयाच दिवशी शासन आदेश निघाला. योजना जाहीर होताच मोठय़ा प्रमाणात जाहिरातबाजी सुरू झाली. यामुळे ही योजना कोणी आणली, यावरून आता संशय येतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने सध्या जाहिरात सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहिराती दिसत नाहीत, असा टोला शिंदे यांनी लगावला.
एका घरात दोन महिलांना लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पाच एकर शेतीची अट काढून टाकण्यात आली आहे. रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र यातही शिथिलता दिली आहे. एका घरात एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोन महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. नोंदणीसाठी आता 60 दिवसांत अर्ज करता येईल. अर्ज ऑगस्टमध्ये आला तरी जुलैपासूनच निधी दिला जाईल. सेतू पेंद्रांना प्रति अर्ज 50 रुपये देण्यात येत असून मध्यस्थांना कुणीही पैसे देऊ नयेत, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.