लाडक्या बहिणींना महायुतीने फसवलं, 2100 रुपयांसाठी पुढच्या भाऊबीजेची प्रतीक्षा करावी लागणार

सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीने दिले होते, परंतु आता त्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. ही योजना भाऊबीजेला सुरू करण्यात आली होती त्यामुळे 1500 चे 2100 रुपये पुढच्या भाऊबीजेपासूनच देता येतील असे विधान भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. ती रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. सुधीर मुनगंटीवार यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सध्यातरी ते शक्य नसल्याचे म्हटले आहे.

मुनगंटीवार हे जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये तातडीने सुरू करण्याबाबत मात्र त्यांनी या मुलाखतीत उदासीनता व्यक्त केली. कोणत्या महिन्यापासून 2100 रुपये देण्यास सुरुवात करायची याबाबत चर्चा करण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

\रक्षाबंधनदिनी योजना सुरू केली. आता पुढच्या भाऊबीजेलाच 1500 चे 2100 रुपये करू. वाढीव मानधन तत्पूर्वी सुरू करावे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत. लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर देशात महायुतीबद्दल चुकीचा संदेश जाईल, असे मुनगंटीवार या मुलाखतीत म्हणाले आहेत.