पत्रकार मुकेश चंद्राकर हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला हैदराबादमधून अटक

छत्तीसगडमधील बस्तर येथे पत्रकार मुकेश चंद्राकर (33) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच मुकेशचा मृतदेह एका कंत्राटदाराच्या घरामागे असणाऱ्या सेप्टिक टँकमध्ये आढळला होता. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर याला पोलिसांनी अटक केली आहे. बीजापूरच्या सायबर पोलीस आणि एसआईटी टीमने सुरेश चंद्राकरला हैदराबादमधून ताब्यात घेतले.

पत्रकार मुकेश चंद्राकर यांनी विजापूर येथील रस्ते घोटाळ्यासंदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली होती. या रस्त्याच्या कामाचे कंत्राट सुरेश चंद्राकर यांनी घेतले होते. तेव्हापासून त्याला धमक्या मिळत होत्या. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तो बेपत्ता झाला. बेपत्ता झाल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर 3 जानेवारी रोजी एका कंत्राटदाराच्या घरातील सेप्टिक टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळला.

पत्रकार मुकेशची हत्या झाल्यापासूनच सुरेश चंद्राकर कुटुंबासह फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी चौकशी सुरु केली. चौकशी दरम्यान पोलिसांनी सुरेशला मदत करणाऱ्या रितेश चंद्राकर, पर्यवेक्षक महेंद्र रामटेके आणि दिनेश चंद्राकर यांना अटक केली. यानंतर पोलिसांनी मुख्यआरोपी सुरेश चंद्राकर यालाही हैदराबाद येथून अटक केली आहे.

मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर हा त्याच्या हैद्राबादमधील ड्रायव्हरच्या घरी लपून बसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी 200 सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुमारे 300 मोबाईल नंबर ट्रेस केले, त्यानंतरच मुख्य आरोपी सुरेश चंद्राकरला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.