मुकेश अंबानी यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट

मुकेश अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. अनंत अंबानीच्या लग्नाच्या पारंपरिक विधींना आज सुरुवात झाली. अनंत आणि राधिका 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. याच दरम्यान मुकेश अंबानी यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. मुकेश अंबानी यांनी दिल्लीतील 10 जनपथ येथे 10 मिनिटे राहुल गांधी यांची भेट घेतली. मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मुकेश अंबानी राहुल गांधी यांच्या घरी आल्याचे बोलले जात आहे.

अंबानी यांच्या मुंबईतील घरी अनंत-राधिकाच्या लग्नाचे विवाहपूर्व विधी सुरू झाले आहेत. देश-विदेशातील पाहुणे विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुकेश अंबानी यांनी राहुल गांधींची भेट घेत त्यांना लग्नाचे निमंत्रण दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनंत-राधिका यांचा 12 जुलै रोजी विवाह, 13 जुलै रोजी आशिर्वाद समारंभ आणि 14 जुलै रोजी रिसेप्शन पार पडणार आहे.