मत्स्योदरी देवीच्या महोत्सवावर 50 सीसीटीव्हींची नजर

अंबड येथील श्री मत्स्योदरी देवीचा नवरात्र महोत्सव 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. 3 ते 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवा दरम्यान गैरप्रकार करणाऱ्यांवर, भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. तसेच 200 पोलीस कर्मचारी दोन शिफ्ट मध्ये यात्रेमध्ये बंदोबस्त देणार आहेत. तयारीच्या आढाव्यासाठी बुधवारी आयोजित बैठकीत मंदिर समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विजय चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक सतीश जाधव, संस्थान सदस्य गीता विलास कुंभेफळकर, कैलास शिंदे आदींची उपस्थिती होती. अंबड तसेच येथील श्री मत्स्योदरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार विजय चव्हाण यांनी विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली. नवरात्र महोत्सवात जालना जिल्ह्यासह मराठवाडा तसेच विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागातील भाविक येतात. त्यांना दर्शन रांगेत उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडपाची व्यवस्थाकरण्यात आली आहे. तसेच वाल टीव्ही, स्पेशल दर्शन आणि नवस फेडण्याचे कार्यक्रम तसेच,घटी बसविण्याचे कार्यक्रम हे मंदिरातील धार्मिक विधी रीतिरिवाजाप्रमाणेच केले जाणार आहे. त्याचप्रकारे आयटीआयचे स्वयंसेवकदेखील मदतीला राहणार आहेत. तसेच डॉक्टर असोसिएशन आणि रोटरी क्लबमार्फत मोफत रुग्ण सेवा देण्यात येणार आहे. यावर्षी रहाट पाळणा, विद्युत तसेच पार्किंगचे टेंडर गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने जास्त गेले आहेत. त्याच प्रकारे 350 दुकानांपैकी 280 दुकानांची अनामत रक्कम म्हणून 12 लाख रुपये जमा झाले असल्याचेही सांगण्यात आले.