
ग्रेट फिनिशर म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनीचे आता शरीर थकले अन् गुडघेही झिजले आहेत. त्यामुळे थला अर्थात धोनी आता 10 षटकेही फलंदाजी करू शकत नाही, अशी माहिती चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी दिलीय.
चेन्नई सुपर किंग्ज संघाला राजस्थान रॉयल्सविरुद्ध हातात असलेल्या सामन्यात 6 धावांनी पराभव पत्करावा लागला. चेन्नईला गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी क्रमामुळे धोनीवर टीका होत आहे. आरसीबीविरुद्ध सामन्यात धोनीने नवव्या क्रमांकवर येत 16 चेंडूंत नाबाद 30 धावा केल्या होत्या, तर राजस्थानविरुद्ध लवकर फलंदाजीला उतरूनही धोनी संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. त्यामुळे ग्रेट फिनिशर धोनीवर आता फलंदाजी क्रमवारीवरून टीका सुरू झाली आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर बोलताना स्टिफन फ्लेमिंग म्हणाले, ‘धोनीचं शरीर, त्याचे गुडघे आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. तो व्यवस्थित मूव्ह होतो, पण तरीही तो आता शरीराने ढिला झाला आहे. खरं सांगायचं म्हणजे, धोनी संपूर्ण 10 षटकं मैदानावर फलंदाजी करू शकत नाही. मात्र, तो आजही संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचं नेतृत्व आणि यष्टिरक्षण संघासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता सामन्यातील परिस्थितीनुसार धोनी स्वतःची भूमिका ठरवत असतो. जर सामना आजच्यासारखा संतुलित असेल तर तो थोडा लवकर फलंदाजीला येतो आणि बाकीच्या वेळेस तो इतर खेळाडूंना संधी देतो. धोनी या सगळय़ा गोष्टी पाहून समतोल साधत आहे,’ असा खुलासाही फ्लेमिंग यांनी केला.