
हैदराबादविरुद्ध नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच महेंद्रसिंह धोनीने टी-20 क्रिकेटमध्ये 400 सामने खेळण्याचा पराक्रम केला. तो रोहित शर्मा (356), दिनेश कार्तिक (412) आणि विराट कोहलीनंतर (407) 400 टी-20 सामने खेळणारा चौथा हिंदुस्थानी ठरला. क्रिकेटविश्वातला तो 24 वा क्रिकेटपटू आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ यष्टीच्या मागे आणि पुढे आपला करिष्मा दाखवणाऱया धोनीच्या विक्रमांच्या यादीत आज आणखी एका विक्रमाची नोंद झाली. आयपीएलचे सर्वच्या सर्व 18 मोसम खेळणारा धोनी आतापर्यंत 273 सामने खेळला आहे. तसेच 98 आंतरराष्ट्रीय सामन्यांतही त्याने आपला खेळ दाखवला असून उर्वरित 29 सामने अन्य टी-20 स्पर्धांत खेळला आहे. त्याने आपल्या दोन दशकांच्या दीर्घ कारकीर्दीत टी-20 क्रिकेटमध्ये 2007 चे वर्ल्ड कप, चेन्नईसाठी आयपीएलचे पाचवेळा आणि दोनदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले आहे. धोनीने आपल्या टी-20 कारकीर्दीत 7566 धावा आणि यष्टीमागे 318 विकेट टिपल्या आहेत. धोनीने आज 400 वा सामना खेळण्याचा विक्रम रचला असला तरी सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडीजच्या कायरन पोलार्डच्या (695) नावावर आहे.