इम्पॅक्ट प्लेअरमुळे नव्हे, खेळपट्टीमुळे धावांचा पाऊस; नियमावरील टीकेवर धोनीची प्रतिक्रिया

आयपीएलला प्रारंभ होऊन जेमतेम चार दिवस झाले नाही तोच ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर टीकेची झोड उडायला सुरुवात झाली आहे. कारण मागील पाचपैकी तीन सामन्यांत मैदानावर इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट दिसला. या नियमाचा फलंदाजांना फायदा होत असून, गोलंदाजांना त्याची जबर किंमत मोजावी लागत असल्याचा आरोप होतोय. मात्र, इम्पॅक्ट प्लेअरमुळे नव्हे, तर खेळपट्टी आणि फलंदाजांचे उंचावलेले मनोबल यामुळे आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पडत आहे, अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनीने दिली.

जिओ हॉटस्टारशी बोलताना महेंद्रसिंह धोनी म्हणाला, ‘इम्पॅक्ट प्लेअर या नियमामुळे धावांचा पाऊस पडत आहे हे साफ चुकीचं आहे. आता मुळात फलंदाजांची मानसिकताच बदललेली आहे, शिवाय पावर प्लेचा नियम आणि फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टय़ा बनविल्यामुळे आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पडत आहे. इम्पॅक्ट प्लेअर नियमाची आयपीएलमध्ये खरंच गरज होती का हे कोडे मला अद्यापही उलगडलेले नाहीये. मी यष्टिरक्षक असल्याने मला तर या नियमाचा काहीच फायदा होत नाही. मात्र, इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा कधी फायदा होतो, तर कधी फटकाही बसतो. फक्त इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे आणखी एक अतिरिक्त फलंदाज मिळत असल्याने इतर फलंदाजांच्या मानसिकतेत बदल होतो. त्यामुळे ते बिनधास्त खेळून धावांची लयलूट करतात,’ असे मला वाटते.

इम्पॅक्ट प्लेअर म्हणजे काय?

आयपीएल 2023मध्ये इम्पॅक्ट प्लेअर हा नवीन नियम आला. या नियमाचे हे तिसरे वर्ष होय. रोहित शर्मा व विराट कोहलीसारख्या स्टार खेळाडूंनीही या नियमाला विरोध केलेला आहे. या नियमासाठी कर्णधार प्लेईंग इलेव्हनसह 5 बदली खेळाडूंचीही निवड करतो. लढतीदरम्यान कर्णधार कुठल्याही वेळी कोणत्याही खेळाडूच्या बदल्यात बदली खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये घेऊ शकतो. म्हणजेच फलंदाजाला संघाबाहेर बसून गोलंदाजाला पाचारण केले जाते  किंवा गोलंदाजाला बाहेर करून फलंदाजाला बोलावले जाते. इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे अष्टपैलू खेळाडूवर खऱया अर्थाने अन्याय होतो, अशी भूमिकाही अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी मांडलेली आहे. मात्र, 2027 पर्यंत हा नियम लागू राहणार असल्याचेही ‘बीसीसीआय’ने वेळोवेळी स्पष्ट केले आहे.