विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा मृद्गंध जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना जाहीर झाला आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष, गायक नंदेश उमप यांनी शनिवारी याबाबत घोषणा केली. विठ्ठल उमप यांच्या स्मृतिदिनानिमित्त 14 वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद्गंध पुरस्कार’ सोहळा 26 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता ठाणे येथील काशीनाथ घाणेकर सभागृह येथे संपन्न होणार आहे. त्यावेळी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
लोककला आणि समाजप्रबोधनाची सुरेख सांगड घालत लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी महाराष्ट्राचा सांगीतिक वारसा समृद्ध केला. या महान कलावंताच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबरला त्यांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह आणि मृद्गंध पुरस्कार सोहळा रंगतो. यंदाच्या सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, कालनिर्णयचे संपादक जयराज साळगावकर, ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालनाची धुरा समीरा गुजर-जोशी सांभाळणार असून या सोहळय़ासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी या सोहळय़ात रंगारंग कार्यक्रम होणार असून तौफिक कुरेशी (झेंबे) वादक आणि ग्रुप, पं. विजय चव्हाण व ग्रुप (महाराष्ट्राची वाद्य) यांच्या सुमधुर संगीताची मेजवानी उपस्थितांना घेता येणार आहे. तसेच सीतारादेवी व नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज विशाल कृष्णा यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद घेता येणार आहे.
आदेश बांदेकर, गौरी सावंत यांनाही पुरस्कार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठत व्यक्तींना ‘मृदगंध पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यंदाच्या सोहळय़ात ज्ञानेश महाराव (लेखक व पत्रकार), सुरेखा पुणेकर (लोककला क्षेत्र), गौरी सावंत (सामाजिक क्षेत्र), आदेश बांदेकर (अभिनय, सूत्रसंचालक), सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती), रोहित राऊत (नवोन्मेष प्रतिभा- संगीत क्षेत्र), दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) यांनाही गौरविण्यात येणार आहे. शाल, पुष्प, पुस्तक, मानपत्र व विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेले मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विशेष म्हणजे, विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे काही बॅकस्टेजच्या कलाकारांना आर्थिक सहकार्याचा हात देत सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न विठ्ठल उमप यांचे चिरंजीव नंदेश उमप करणार आहेत.