एमपीएससी परीक्षा आता मराठीतून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यात एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा यापुढे इंग्रजीसोबतच मराठीमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याविषयी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृषी-अभियांत्रिकीविषयक पुस्तके मराठी भाषेत बनवण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाले की, परीक्षाही मराठीतून होतील. अभियांत्रिकी शिक्षणही मराठी भाषेत घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची पुस्तकेही मराठीत उपलब्ध होतील. त्या अनुषंगाने सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षाही मराठीमध्ये घेण्याचे नियोजन केले असल्याचे फडणवीस म्हणाले.