
>>पंकज मोरे, वैभववाडी
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी जुन्या हॉल तिकिटावर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना नुकत्याच जाहीर झालेल्या निकालातून वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 निकाल जाहीर करताना आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले की, ज्या उमेदवारांनी जुन्या हॉल तिकिटावर परीक्षा दिली. त्यांना निकालातून वगळण्यात आले आहे. ही बाब अत्यंत धक्कादायक आणि अन्यायकारक आहे. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर उमेदवारांची ओळख पटवल्यानंतर हॉल तिकीट व ओळखपत्र तपासूनच परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाते. जर जुन्या हॉल तिकिटावर प्रवेश देण्यात आला, तर ही जबाबदारी पूर्णतः परीक्षा केंद्रावर उपस्थित अधिकारी व आयोगाची आहे. उमेदवारांनी कोणताही नियम मोडला नाही, मग त्यांना निकालातून वगळणे त्यांच्यावर अन्याय केला आहे.
परीक्षेच्या दिवशीच उमेदवारांना प्रवेश नाकारण्याऐवजी निकालाच्या वेळी का वगळले जात आहे. बायोमेट्रिक नोंदणी झाल्यानंतर आणि प्रवेश दिल्यानंतर निकाल रद्द करणे ही उमेदवारांची नाही, तर परीक्षा व्यवस्थापनाची चूक आहे. या संदर्भात आयोग कोणती पावले उचलणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या उमेदवारांचे निकाल रोखले गेले आहेत, त्यांची फेरतपासणी करून त्यांना संधी देण्यात येईल का? तसेच भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी आयोग कोणती ठोस उपाययोजना करणार आहे? शिवाय परीक्षेत बसलेल्या आणि सर्व अधिकृत प्रक्रिया पूर्ण केलेल्या उमेदवारांना निकालात समाविष्ट करावे. आयोगाने या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी.परीक्षेच्या नियमावलीत सुधारणा करून अशा अन्यायकारक घटनांना आळा घालावा. जेणेकरून उमेदवारांच्या भविष्यावर अन्याय होऊ नये, म्हणून आयोगाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा. अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.
याप्रकरणी एमपीएससीच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांच्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेले प्रश्न
1) आपण जेव्हा सुरुवातीला परीक्षा केंद्रात जातो तेव्हा बाहेर तपासणी यंत्रणा असते ती ओळखपत्र, प्रवेशपत्र, आणि डोळे सुद्धा स्कॅन करते. हॉलतिकीट वरील बारकोडला स्कॅन करून त्यांचं एक छोटासा बारकोड लावून पुढे पाठवते. मग जूने हॉलतिकीट होते तर ते स्कॅन झालेच कसे?
2) आपण परीक्षा हॉल मध्ये गेल्यावर बैठक व्यवस्था क्रमांक असतो जर जुने हॉलतिकीट होत तर ते बैठक नंबर जुळवून आलेच कसे?
3) परीक्षा हॉल मध्ये 25 विद्यार्थ्यांना एक शिक्षक असतात ते सर्व बाबी तपासून सही करतात तिथे हा प्रकार कसा कळला नाही?
4) आयोगाची एक उपस्थित आणि अनुपस्थित परीक्षा उमेदवारी हजेरीपट पुस्तिका असते जिथे आपली सर्व माहिती असते मग तिथे आपल्या नंबर समोर आपली सही करतो तिथे सुद्धा ती चूक दिसून आली नाही?
5) परीक्षा पार पडल्या नंतर दुसऱ्या दिवशी आयोगाला परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध असते मग तेव्हाच त्यांना का बाहेर काढले नाही? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाले आहेत.