महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यामातून (MPSC) रविवारी राज्याच्या विविध परीक्षा केंद्रांवर ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024’ पार पडली. राज्यभरातून हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मात्र या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर या प्रश्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसतेय.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ही विविध कारणांमुळे लांबली होती. अखेर 1 डिसेंबर रोजी राज्याच्या विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र, या परीक्षेत पेपर क्रमांक 2 मध्ये विचारण्यात आलेला एक प्रश्न वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पेपर क्रमांक 2 मध्ये विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता व व्यवस्थापन कौशल्य यासंदर्भात प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न आणि चार पर्याय अशा स्वरुपाचे प्रश्न पेपर क्रमांक 2 मध्ये विचारले जातात. असाच एक मद्यपानासंदर्भातला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहे. जर तुम्हाला त्यांच्यासोबत जायचे नसेल आणि अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वत:ला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न पेपर क्रमांक 2 मध्ये विचारण्यात आला होता. या प्रश्नाला पुढील प्रमाणे चार पर्याय देण्यात आले होते.
1) मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आह.
2) दारू पिण्यास नकार देईन
3) फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन
4) नकार देईन आणि त्यांना खोटं सांगेन की बोलेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे