तळेगावमधील फॉक्सकॉन प्रकल्प भाजपने ओढून नेला ! खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात

‘तळेगावात आलेला ‘वेदान्ता-फॉक्सकॉन’ प्रकल्प भाजपने ओढून गुजरातला नेला. सहा लाख नोकऱ्या या भागातल्या मुलांना मिळणार होत्या. आमच्या मुलांच्या सहा लाख नोकऱ्या तुम्ही खाल्ल्या, तुम्हाला घालवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,’ ‘असा घणाघात खासदार सुप्रिया सुळे ठे यांनी केला. 11 आमचा संघर्ष वैयक्तिक नाही. महागाई, बेरोजगारी, अधिकार, भ्रष्टाचार आणि अदृश्य शक्तीविरोधात आमची लढाई असल्याचेही त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे झालेल्या महिला मेळाव्यात त्यांनी महायुतीवर कडाडून टीका केली. शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर मोहिनी लांडे, माजी आमदार विलास लांडे, उमेदवार अजित गव्हाणे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, माजी नगरसेविका विनया तापकीर आदी उपस्थित होते. मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेविका प्रियंका बारसे, संगीता ताम्हाणे, माई काटे, स्वाती साने, स्वाती चिटणीस, रूपाली आल्हाट, मंदा आल्हाट, शुभांगी बोऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात पळविले जात आहेत. दुसऱ्या राज्यात प्रकल्प नेण्याबद्दल दुमत नाही. मात्र, आमच्या मुलांच्या ताटातला घास हिसकावून नेण्याची भाजपची वृत्ती निंदनीय आहे. तळेगावात आलेला वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प यांनी गुजरातला पळवला. आमच्या मुलांच्या ताटातला घास काढून घेण्याचे पाप भाजपने केलेले आहे. आज हा प्रकल्प सुरू झाला असता तर सहा लाखांहून अधिक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. आमच्या मुलांच्या नोकऱ्या खाणाऱ्या या भाजपच्या उमेदवारांना त्यामुळे घरी बसवायचे आहे.

 ईडी कारवाईपासून वाचण्यासाठीच अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे आमदार भाजपबरोबर गेल्याचे सांगत सुळे म्हणाल्या, ‘भाजपबरोबर गेल्यापासून त्यांना शांत झोप लागते. ईडीची धाड टाकायची आणि पक्षात घ्यायचे, हे भाजपचे राजकारण सुरू आहे. पळपुटे पळून गेले. मात्र, आम्ही मोडू, पण दिल्लीच्या तख्तासमोर वाकणार नाही, झुकणार नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ सरकारला आठवली नाही, त्याचा मी अनुभव घेत आहे. लोकसभेला दणका बसल्यानंतर ‘लाडकी बहीण’ आठवली. भाजप खासदार दुसऱ्या पक्षाच्या सभेला गेल्यास पैसे वसूल केले जातील, अशा धमक्या देतो. हे काय यांच्या घरातले पैसे देत आहेत काय?’ असेही सुळे म्हणाल्या.

धमक्यांचा काळ गेला

‘भोसरीचे भाजपचे उमेदवार 20 तारखेनंतर आपले खरे रूप दाखविण्याची धमकी देत आहेत. त्यांनी एका व्यक्तीला जरी भीती दाखवावी. महिला लाटणे घेऊन मागे लागतील. धमक्यांचा काळ आला-गेला. ते जेवढ्या धमक्या देतील, तेवढी मते अजित गव्हाणे यांची मते वाढतील,’ असेही सुळे म्हणाल्या.