पुणे-सातारा डेमू गाडीची असुविधा, व्हिडीओ शेअर करून सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे उपाययोजना करण्याची मागणी

पुणे-सातारा डेमू गाडीच्या असुविधेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. याबाबत सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

एक्सवर पोस्ट करून सुळे म्हणाल्या की, पुणे-सातारा डेमू गाडीच्या बाबतीत दररोज तक्रारी येत आहेत. नुकतीच ही गाडी शिंदवनी घाटात धोकादायक ठिकाणी गाडी बंद पडली होती. असे प्रकार सातत्याने घडत असून याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गाडीने मोठ्या संख्येने नोकरदार, विद्यार्थी, कामगार आदी वर्ग प्रवास करीत असतो. गाडी बरेचदा वेळेत पोहोचत नाही असे प्रवाशांचे म्हणणे आहे. यामुळे काही जणांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे असे सुळे म्हणाल्या.

याखेरीज ही गाडी थेट पुणे स्टेशनवर पोहोचत नाही. त्यामुळे देखील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही अतिशय खेदजनक बाब आहे. माझी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव यांना नम्र विनंती आहे की कृपया आपण याची गांभीर्याने नोंद घेऊन प्रवाशांना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्या अशी मागणी सुळे यांनी केली आहे.