Rakibul Hussain – आसाममध्ये काँग्रेस खासदार रकीबुल हुसैन यांच्यावर जमावाचा हल्ला, सुरक्षारक्षक जखमी

भाजपशासित राज्य आसाममध्ये काँग्रेस खासदार रकीबुल हुसैन आणि त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांवर जमावाने हल्ला केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी गुनाबाडी येथे जात असताना जमावाने त्यांना घेरले आणि मारहाण केली. नगाव जिल्ह्यातील रुपोहीहाट येथे गुरुवारी ही घटना घडली. यामुळे राजकीय वातावरण गरम झाले असून हिमंत बिस्वा सरमा सरकारवर चौफेर टीका होत आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जमावाने खासदार रकीबुल हुसैन यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांच्यावर बॅटने हल्ला चढवला. या त्यांना वाचवण्यासाठी आलेले दोन सुरक्षारक्षक यात जखमी झाले. या हल्ल्यानंतर विरोधकांनी आसाममधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला.

रकीबुल हुसैन यांच्यावरील हल्ल्यानंतर काँग्रेसने हिमंत बिस्वा सरमा सरकारवर टीका केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांनी रकीबुल हुसैन यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. भाजप नेहमीच म्हणते की आम्हाला काँग्रेसमुक्त भारत हवा आहे. लोकांना धमकावून हे साध्य करण्याचा त्यांचा डाव असू शकतो, असा घणाघात सैनिका यांनी केला. तसेच सरकारच्या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, रकीबुल हुसैन यांच्यावर हल्ला करणाऱ्यांची ओळख पटल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिली आहे. सरमा यांनी ट्विट करत दहा आरोपींची नावेही सांगितली.