
गंगौर विसर्जनासाठी विहिरीची स्वच्छता करण्यासाठी आठ जण विहिरीत उतरले. मात्र घाणीमुळे विहिरीत तयार झालेल्या विषारी वायुमुळे गुदमरून आठही जणांचा मृत्यू झाला. सहा जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून बचाव कार्य सुरू आहे. मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यामध्ये छैगाव माखन परिसरातील कोंडावत गावात गुरूवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली.
सदर विहिरीच्या शेजारीच एक गटार आहे. या गटारातून गावातील घाण पाणी वाहून येते आणि हे पाणी या विहिरीत जाते. यामुळे विहिरीत दलदल तयार झाली आहे. हे साफ करण्यासाठी 8 जण विहिरीत उतरले होते. मात्र गटाराच्या पाणी विहिरीत घुसत असल्याने तेथे विषारी वायू तयार झाला होता. या वायूमुळे सफाईसाठी उतरलेले लोक गुदमरले आणि त्यांचा मृत्यू झाला.
हरी, आसाराम, गोविंद, गोपाल, मन्साराम, मोहन, सुखराम, आत्माराम अशी मयतांची नावे आहेत. विहिरीत सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अन्य दोन मृतदेहांचा शोध सुरू आहे.